नाशिकचे खासदार हेमंत गोडसे तातडीने मुख्यमंत्र्याच्या भेटीला रवाना; उमेदवारी बाबत चर्चा
By संजय पाठक | Published: March 24, 2024 05:52 PM2024-03-24T17:52:56+5:302024-03-24T17:53:06+5:30
आज रात्री आठ वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गोडसे तसेच पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.
संजय पाठक
नाशिक- दोन दिवसांपूर्वी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन लोकसभेच्या नाशिकच्या जागेत संदर्भात चर्चा केली त्यानंतर झपाट्याने घडामोडी घडल्या असून नाशिकचे शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने पाचारण केले आहे. त्यानुसार खासदार गोडसे तसेच नाशिक मधील शिंदे गटाचे पदाधिकारी आणि गोडसे यांचे समर्थक तातडीने ठाणे येथे रवाना झाले आहेत.
आज रात्री आठ वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गोडसे तसेच पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत पक्षीय वातावरणाचा आणि गोडसे यांच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे. खासदार हेमंत गोडसे हे सलग दोन वेळा निवडून आलेले आहेत. या दोन्ही वेळेस राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांचा पराभव केला होता त्यामुळे दोन दिवसांपूर्वी भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन काय चर्चा केली हे स्पष्ट झाले नसले तरी एकंदरच गोडसे यांच्या ऐवजी नाशिकची जागा शिंदे राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोडावी अशी त्यांनी मागणी केल्याचे सांगण्यात येते. खासदार गोडसे यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता त्यांनी भुजबळ यांनी नाशिकच्या जागेवर दावा केला असेल असे मत व्यक्त केले.