आॅगस्टपासून नाशिक-मुंबई विमानसेवा
By admin | Published: June 6, 2015 12:42 AM2015-06-06T00:42:47+5:302015-06-06T00:42:59+5:30
आॅगस्टपासून नाशिक-मुंबई विमानसेवा
नाशिक : सी प्लेनच्या माध्यमातून नाशिकहून पुणे विमानसेवा येत्या १५ जूनपासून सुरू होत असून, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात नाशिक ते मुंबई विमानसेवाही सुरू होत आहेत. ओझर ते जुहूदरम्यान ही सेवा असून, ती आॅगस्टमध्ये सुरू होईल.
सी प्लेनच्या योजनेसंदर्भात उद्योजक आणि व्यावसायिकांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी आयोजित बैठकीत मेहेरचे सहसंस्थापक सिद्धार्थ वर्मा यांनी ही माहिती दिली. नाशिक ते पुणे ही विमान्सेवा केवळ सोमवार ते शुक्रवार अशीच असणार आहे. सी प्लेनच्या क्षेत्रात काम करणाऱ्या मेहेर कंपनीने गंगापूर धरणाचा वापर करून नाशिक ते मुंबई सेवा देण्याची तयारी यापूर्वी केली होती. तथापि, त्याला झालेला विरोध बघता कंपनीने जमिनीवरून टेक आॅफ करणारे तसेच उतरणारे तसेच पाण्यावरून झेपावू शकेल अशा विमानाच्या माध्यमातून नाशिक ते पुणे सेवा सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. ओझर ते लोहगाव या विमानसेवेसाठी याच सी प्लेनचा वापर करण्यात येणार आहे. येत्या १५ जूनपासून ही सेवा सुरू होणार आहे. गंगापूर धरण येथून सी प्लेन सुरू करण्यासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या आहेत; परंतु सध्या धरणातील पाणी कमी झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर ही सेवा तूर्तास ओझर येथून सुरू होणार आहे. नंतर मात्र नियमित सी प्लेन सुरू राहील, असे त्यांनी सांगितले. नाशिक-पुणे सेवेसाठी तूर्तास नऊ आसनी विमानाचा वापर केला जाणार आहे. १५ जूनपासून सुरू होणाऱ्या विमानसेवेसाठी ५९९९ रुपये शुल्क असणार आहे; मात्र जुलैपासून हेच शुल्क ६९९९ रुपये असणार आहे. मात्र दुसऱ्या टप्प्यात नाशिक ते मुंबई (जुहू विमानतळ) सेवेसाठी १९ आसनी विमान असणार आहे.
नाशिक ते पुणे सेवेपाठोपाठ नाशिक ते मुंबई सेवा सुरू करण्यासाठी १५ आॅगस्टचा मुहूर्त असून, पावसाळा संपल्यानंतर ही सेवा गंगापूर धरण ते जुहू अशी असणार आहे, असे त्यांनी सांगितले. या सेवेचे सुरुवातीला भाडे ५९९९ रुपये इतकेच राहणार असून, नंतर ते वाढविले जाणार आहे, असे वर्मा यांनी सांगितले. यावेळी मेहेरचे संचालक एस. के. मन, महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष दिग्विजय कापडिया, वरिष्ठ उपाध्यक्ष संतोष मंडलेचा, तान या ट्रॅव्हल्स व्यावसायिकांच्या संघटनेचे अध्यक्ष दत्ता भालेराव यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
जोड