नाशिक - मुंबई महामार्ग आढाव्याच्या बैठकीचीही कोंडी!
By संजय पाठक | Published: July 9, 2024 06:06 PM2024-07-09T18:06:55+5:302024-07-09T18:07:24+5:30
मुहूर्त लागेना: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलवली बैठक सलग दुसऱ्या दिवशीही रद्द
संजय पाठक, नाशिक: सध्या नाशिक- मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडी हा सर्व सामान्य नागरीकांच्या त्रासाचा विषय असून राज्य विधी मंडळाचे अधिवेशन असताना तीन आमदारांनी हा विषय मांडला. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेऊ असे जाहिर केले. प्रत्यक्षात सोमवार आणि मंगळवार असे सलग दोन दिवस बैठक जाहिर करून ती रद्द करण्यात आली.
नाशिक- मुंबई महामार्गाची अवस्था बिकट झाली असून उद्योग व्यवसायिकांबरोबर उच्च न्यायालय किंवा रूग्णालयात जाणारे येणारे नागरीक सरकारी अधिकारी सारेच वैतागले आहेत. यासंदर्भात वाहतूक केांडीत अडकलेल्या माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सरकारला धारेवर धरले, त्यानंतर आमदार देवयानी फरांदे यांनी हा विषय मांडला. त्यानंतर आमदार सीमा हिरे यांनी तर मुंबईहून लंडनला जाणे सोपे, पण नाशिकला जाणे कठीण अशी टीकाही केली.
दरम्यान, सोमवारी (दि.८) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी दहा वाजता मंत्रालयात बैठक बोलावली होती. मात्र, सोमवारी मुंबईत मुसळधार पाऊस असल्याने ही बैठक रद्द झाली. त्यानंतर ही बैठक मंगळवारी (दि.९) होणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, मंगळवारी देखील ही बैठक होऊ शकली नाही. या बैठकीला मुहूर्त केव्हा लागणार असा प्रश्न केला जात आहे.