Nashik: मनपाच्या अतिरिक्त आयुक्त ॲक्शन मोडवर
By Suyog.joshi | Published: February 6, 2024 11:57 AM2024-02-06T11:57:43+5:302024-02-06T11:58:00+5:30
Nashik News: सर्व विभागप्रमुखांनी आपल्या कामांचे प्रेझेंटेशन लवकरात लवकर सादर करावे. संबंधित कामांचा अभ्यास करुन शहर विकासासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी स्मिता झगडे यांनी दिली.
- सुयोग जोशी
नाशिक - सर्व विभागप्रमुखांनी आपल्या कामांचे प्रेझेंटेशन लवकरात लवकर सादर करावे. संबंधित कामांचा अभ्यास करुन शहर विकासासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी स्मिता झगडे यांनी दिली. रूजू होताच त्यांनी ॲक्शन घेत मनपा मुख्यालयातील त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या विविध विभागात प्रत्यक्ष जाऊन कामांची माहिती घेतली. पिंप्री चिंचवड येथून आलेल्या स्मिता झगडे यांनी शुक्रवारी (दि.२) मनपात येऊन अतिरिक्त आयुक्त पदाचा पदभार स्विकारला होता.
यानंतर शनिवारी व रविवार सुट्टी आली होती, तर आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी त्यांनी सर्व विभागात जाऊन प्रत्यक्ष भेटी देऊन कामांचा आढावा घेतला. दरम्यान आपण मनपा आयुक्तांसह सर्व अधिकारी व सेवकांना सोबत घेऊन नाशिक शहराच्या दृष्टीने चांगले काम करणार असल्याचे सांगितले. त्याच प्रमाणे स्वच्छ शहरांमध्ये आपले नाव येण्यासाठी नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. झगडे यांच्याकडे आरोग्य, अग्निशमन, घनकचरा संकलन, मलेरीया यासारखे महत्वाचे विभागाचे कामकाज आहे. शहराचा कचरा गोळा करण्यासाठी घंटा गाडीचा प्रयोग नाशिकमध्ये सुरू झालेला आहे.
मात्र मागच्या वेळी सुमारे पावणे दोनशे कोटींचा ठेका यंदा तब्बल सुमारे ३५० कोटींवर गेलेला आहे. त्यावेळी तो चर्चेचा विषय बनला होता. सुमारे २५ लाख लोकसंख्या झालेल्या नाशिक शहराचा कारभर हाकणाऱ्या महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (सेवा) हे पद मागील सुमारे सहा महिन्यांपासून रिक्त होते. त्यामुळे इतर वरिष्ठ अधिकार्यांवर कामाचा ताण निर्माण झाला होता. मात्र झगडे यांची नियुक्ती झाल्यानंतर इतर अधिकाऱ्यांचाही भार कमी झाला आहे.