नाशिक महापालिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:15 AM2020-12-31T04:15:00+5:302020-12-31T04:15:00+5:30
- केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणामध्ये नाशिकने यंदा बाजी मारली आणि देशात अकरावा, तर राज्यात दुसरा क्रमांक पटकावला. - ...
- केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणामध्ये नाशिकने यंदा बाजी मारली आणि देशात अकरावा, तर राज्यात दुसरा क्रमांक पटकावला.
- गेल्या चार वर्षांपासून नाशिक महापालिकेचे टॉप टेनमध्ये येण्याचे स्वप्न होते. ते पूर्ण झाले नसले, तरी टॉप टेनपर्यंत धडक मारली आहे.
---------------
स्मार्ट सिटी शायनिंग
- स्मार्ट सिटीबाबत कितीही वाद-विवाद असले, तरी नाशिकने यंदा चमकदार कामगिरी बजावत देशात पहिला क्रमांक पटकावला. अर्थात, त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात हा क्रमांक घसरला असून, आता राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
- स्मार्ट रोड झाला खुला. अवघा १.१ किलोमीटर लांबीचा आणि तब्बल १७ कोटी रुपये खर्च झालेला स्मार्ट रोड अखेरीस महिन्यात नागरिकांसाठी खुला झाला.
- स्मार्ट सिटी कंपनीचे अनेक प्रकल्प आता मार्गी लागले, यात प्रोजेक्ट गोदा, गावठाण विकास प्रकल्प आणि अन्य प्रकल्पांचा समावेश आहे.
- स्मार्ट सिटीच्या वतीने मग मखमलाबाद येथे ७०३ एकर क्षेत्रावर साकारण्यात येत असलेला ग्रीनफिल्ड विकास प्रकल्प बऱ्यापैकी मार्गी लागला आहे.
- या प्रकल्पासाठी तयार करण्यात आलेल्या टीपी स्किमचा आराखडा शासनाच्या नगररचना खात्याला सादर करण्यात आला आहे.
--------------
युनिफाइड डीपीसीआर मार्गी
- सर्व शहरांसाठी एकच सामूहिक बांधकाम नियमावली असलेला युनिफाइड डीसीपीआर अखेरीस नोव्हेंबर महिन्यात मंजूर झाला. त्यामुळे शहरातील बांधकामांचा रखडलेल्या विकास कामांचा मार्ग मेाकळा झाला आहे. २०१७ मध्ये मंजूर नाशिकच्या बांधकाम नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीत वाहनतळासाठी अतिरक्त जागा सोडणे, बारा टक्के ॲमेनिटी स्पेस आणि सामासिक अंतराच्या निर्बंधांचा प्रश्न सुटल्याने बांधकाम व्यवसायाला चालना मिळाली आहे.
-------------
नवे बिटको रुग्णालय सुरू
- केारोना संकटामुळे महापालिकेत आणखी एक इष्टापत्ती झाली आणि नाशिक रोड येथील नवे बिटको रुग्णालये उद्घाटनाविनाच सुरू झाले. दोनशे खाटांचे हे रुग्णालय असून, या ठिकाणी वीस हजार लीटर्स क्षमतेची ऑक्सिजन टाकी बसविण्यात आल्याने व्हेंटिलेटर बेडचा प्रश्न सुटला आहे.
- महापालिकेचे डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयही डेडिकेटेड कोविड सेंटर म्हणून घोषित झाले. या ठिकाणी दहा हजार लीटर्स क्षमतेची ऑक्सिजनची टाकी बसविण्यात आली आहे.
- महापालिकेने केारोना काळात निव्वळ आरोग्य व्यवस्थेवर ४५ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा खर्च केला आहे. अजूनही खर्च होत आहे.
-------------
मनपाच्या विकास कामांची पायाभरणी
- शहरात एकात्मिक वाहतूक विकास आराखड्याअंतर्गत त्र्यंबक रोडवर भवानी चौक आणि सिडकोत त्रिमूर्ती चौकाला मंजुरी देण्यात आली. या दोन्ही पुलांसाठी १२० कोटी रुपये खर्च येणार आहे.
- गंगापूर रोडवर गोदावरी नदीवर तीन पूल बांधण्यास महापालिकेने मंजुरी दिल्यानंतर त्याच्या निविदा मागवण्यात आल्या आहेत. अर्थात, त्यातील चव्हाण कॉलनी येथील एका पुलाला उच्च न्यायालयाने स्थगिती देण्यात आली आहे.
- नाशिक रोड येथे दर वर्षी उन्हाळ्याच्या शेवटी पाणी समस्येला सामाेरे जावे लागते. ती दूर करण्यासाठी महापौर सतीश कुलकर्णी यांनी १९ केाटी रुपयांची थेट जलवाहिनी टाकण्यासाठी मंजुरी दिली आहे.
- सिडकोत मुकणे धरणातून पाणीपुरवठा सुरू झाला असला, तरी त्यानंतरही पर्यायी सोय म्हणून गंगापूर धरणातून पाणी पुरविण्यासाठी आणखी एक पर्यायी जलवाहिनी टाकण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
- शहरातील विविध भागांतील जलवितरण सुधारवण्यासाठी १३ नवीन जलकुंभ बांधण्यास महापालिकेने मान्यता दिली आहे.
- वडाळा शिवारात आठ हेक्टर क्षेत्राची कब्रस्तानसाठी आरक्षित जागा ताब्यात घेण्यासाठी ६० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यास महासभेत मान्यता देण्यात आली आहे.
------
वायु प्रदुषणमुक्ततेसाठी २० कोटी
- महापालिकेने सादर केलेला वायू गुणवत्ता सुधार आराखडा केंद्र शासनाने चालू वर्षी फेब्रुवारी महिन्यात मंजूर केला. त्यानंतर, नाशिक शहरातील हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी २० कोटी रुपये राज्य शासनाने दिले आहेत. महापालिकेला प्रथमच अशा प्रकारचा निधी मिळाला आहे.
- गोदावरी नदी प्रवाही राहावी, यासाठी प्रोजेक्ट गोदाअंतर्गत दुतेांड्या मारोती ते गाडगे महाराज पुलाखालील नदीपात्रातील तळ काँक्रिटीकरण काढण्यास प्रारंभ झाला आहे.
- गोदावरी नदीच्या परीसरातील १७ कुंडांचे पुनरुज्जीवन करण्यासाठीही चाचणी करण्यात आली असून, आता लवकरच त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे.
----
फेरबदल प्रशासन आणि राजकारणातही
महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांची जून महिन्यात अचानक बदली करण्यात आली. त्यांच्या जागी कैलास जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. गमे यांना नंतर विभागीय आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले.
- महापालिकेत पक्षीय तौलनिक बळानुसार स्थायी समिती सदस्य नियुक्तीचा वाद गाजला. त्यानंतरही न्याय प्रविष्ट प्रकरणात भाजपचे गणेश गीते यांनी बाजी मारली.
- महापालिकेच्या विषय समित्यांच्या निवडणुकीत यंदा प्रथमच स्वाक्षरी जुळत नसल्याने शहर सुधार, तसेच आरोग्य समितीच्या सर्व उमेदवारांचे अर्ज बाद करण्याची नामुष्की ओढावली.
- कोरोनामुळे रखडलेल्या निवडणुका अखेरीस नोव्हेंबर अखेरीस जाहीर झाल्या. महिला बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी भाजपाच्या स्वाती भामरे, तर विधी समितीच्या सभापतीपदीही भाजपच्याच केामल मेहरोलीया यांची बिनविरोध निवड झाली.