नाशिक महापालिकेत पाच स्वीकृत सदस्यांची अखेर नियुक्ती घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 04:05 PM2017-11-20T16:05:21+5:302017-11-20T16:07:48+5:30
नऊ महिन्यांनंतर मुहूर्त : भाजपाचे तीन, सेनेचे दोन सदस्य नियुक्त
नाशिक - गेल्या नऊ महिन्यांपासून महापालिकेत नियुक्त करावयाच्या स्वीकृत सदस्यत्वाची हंडी अखेर सोमवारी (दि.२०) फुटली. महापौर रंजना भानसी यांनी महासभेत भाजपाचे तीन तर शिवसेनेच्या दोन सदस्यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून घोषणा केली. शिवसेनेने दीड महिन्यांपूर्वीच आपल्या सदस्यांची नावे नगरसचिव विभागाकडे दिलेली होती तर भाजपात मात्र, सदस्यांच्या नावावर एकमत होत नव्हते. त्यामुळे, नियुक्ती प्रक्रिया रखडली होती. अखेर, नऊ महिन्यांनंतर स्वीकृतच्या नियुक्तीला मुहूर्त लागला.
महासभेत महापौर रंजना भानसी यांनी भाजपाचे शहर सरचिटणीस प्रशांत गोरख जाधव, भाजयुमाचे शहराध्यक्ष अजिंक्य विजय साने आणि नाशिकरोड भाजपा मंडलाचे अध्यक्ष बाजीराव लहानू भागवत तर शिवसेनेचे कार्यालयीन कर्मचारी सुनील गोडसे आणि महिला आघाडीच्या शहराध्यक्ष अॅड. श्यामला दीक्षित यांच्या नावाची स्वीकृत सदस्य म्हणून घोषणा केली. या नियुक्त सदस्यांचा महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महापालिका निवडणुकीत भाजपाने ६६ जागा जिंकत सत्ता संपादन केली. निवडणुकीनंतर महिनाभरात स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होणे अपेक्षित होते. पक्षीय तौलनिक संख्याबळानुसार, भाजपाचे तीन तर शिवसेनेचे दोन सदस्य स्वीकृत म्हणून नियुक्त करायचे होते. मात्र, भाजपात तीन स्वीकृत सदस्यत्वासाठी सुमारे दीडशेहून अधिक इच्छुक असल्याने पक्षाची पंचाईत झाली होती. निवडणुकीत तिकिट वाटपावेळी भाजपा नेत्यांकडून अनेकांना स्वीकृतचे गाजर दाखवत उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घ्यायला लावण्यात आली होती. त्यामुळे, स्वीकृतसाठी मोठ्या प्रमाणावर चुरस निर्माण झाली होती. भाजपात घोळ सुरू असतानाच दीड महिन्यांपूर्वी, शिवसेनेने मात्र, सुनील गोडसे आणि अॅड. श्यामला दीक्षित यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत त्यांचे नामनिर्देशनपत्र नगरसचिव विभागाला सादर केले होते. त्यामुळे भाजपावर आयुक्तांकडूनही नावे सादर करण्यासाठी दबाव वाढलेला होता. अखेर, प्रशांत जाधव, माजी नगरसेवक विजय साने यांचे सुपुत्र अजिंक्य साने आणि बाजीराव भागवत या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. स्वीकृतसाठी भाजपात संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते शरद कुलकर्णी, नीलेश बोरा, माजी नगरसेवक लक्ष्मण सावजी, सुजाता करजगीकर, भारती बागूल, पुष्पा शर्मा यांचीही नावे चर्चेत होती तर रिपाइंचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्याही नावाची चर्चा घडवून आणली गेली. अखेर, सुरुवातीपासून शर्यतीत कायम असलेल्या तिघांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महिला कार्यकर्त्यांत नाराजी
स्वीकृत सदस्यत्वासाठी शिवसेनेने महिला कार्यकर्त्याला संधी दिली असताना भाजपातही एका महिलेला प्रतिनिधीत्व दिले जाईल, अशी अटकळ बांधली जात होती. त्यामुळे भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या आणि पक्षाच्या प्रत्येक आंदोलनात सक्रीय सुजाता करजगीकर व भारती बागूल यांच्या नावाची चर्चा होत होती. परंतु, भाजपाने महिलांना संधी न दिल्याने इच्छूक महिला कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. दीर्घकाळ पक्षात राहूनही न्याय न मिळाल्याने नाराजीची भावना इच्छुक महिलांनी बोलून दाखवली तर काही इच्छुकांनी अजूनही आपल्याला पक्षाकडून न्यायाची अपेक्षा असल्याचे सांगण्यात आले.