नाशिक मनपाने कानेटकर उद्यान साकारले चक्क वन जमिनीवर; वनखाते म्हणाले आमची जागा आम्हाला परत द्या

By अझहर शेख | Published: March 23, 2023 12:45 PM2023-03-23T12:45:45+5:302023-03-23T12:46:19+5:30

गंगापूर गावातील महापालिकेचे वसंत कानेटकर उद्यान हे वन विभागाच्या राखीव वनाच्या जमिनीवर साकारले गेल्याचा दावा करण्यात आला आहे.

nashik municipal corporation created kanetkar garden on forest land and department wants it to back | नाशिक मनपाने कानेटकर उद्यान साकारले चक्क वन जमिनीवर; वनखाते म्हणाले आमची जागा आम्हाला परत द्या

नाशिक मनपाने कानेटकर उद्यान साकारले चक्क वन जमिनीवर; वनखाते म्हणाले आमची जागा आम्हाला परत द्या

googlenewsNext

नाशिक : गंगापूर गावातील महापालिकेचे वसंत कानेटकर उद्यान हे वन विभागाच्या राखीव वनाच्या जमिनीवर साकारले गेल्याचा दावा करण्यात आला आहे. ब्रिटिशकालीन सर्व्हे क्रमांक १५०/१५१मधील सुमारे २७ एकर इतके हे वनक्षेत्र आहे. तसेच म्हसरूळ शिवारातील ब्रिटिश सर्व्हे क्रमांक ३३मधील आयुर्वेद विज्ञान महाविद्यालय उभारणीकरिता विचाराधीन असलेली नियोजित जागा देखील वनजमीन असल्याचे पश्चिम वन विभागाने मनपा आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, या सर्व वन जमिनी वन विभागाला हस्तांतरित करण्याची मागणी वन खात्याने केली आहे.

महापालिका हद्दीमधील मौजे म्हसरूळ, मौजे गंगापूर, मौजे चेहेडी बुद्रुकमधील काही जमिनी राखीव वने असल्यामुळे त्या पुन्हा वन विभागाकडे हस्तांतरित कराव्यात, असे पत्र उपवनसंरक्षक पंकज कुमार गर्ग यांनी महापालिका आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांना पाठविले होते. वन विभागाने मनपा हद्दीतील वरील गावांमधील मागणी केलेल्या बिटिश सर्व्हे क्रमांकाच्या जागा हस्तांतरित करण्याबाबत जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांना कळविले असल्याचे पुलकुंडवार यांनी पत्राला उत्तर देताना म्हटले आहे.

तसेच त्याची प्रत पुर्व वन विभागाचे उपवनसंरक्षक उमेश वावरे यांनाही पाठविली असून त्यांच्या हद्दीतील काही वनजमिनी ज्या महापालिका क्षेत्राच्या हद्दीत असतील तर वन अभिलेखानुसार यादी उपलब्ध करून देण्याची विनंतीही केली आहे. महापालिका हद्द पश्चिम वन विभागाच्या नाशिक वन परिक्षेत्रातील सातपुर, नाशिक वनपरिमंडळांतर्गत येते.

महसूलकडून परस्पर ग्रामपंचायतीला वर्ग!

नाशिक वन परिमंडळातील म्हसरूळ शिवरातील जुना ब्रिटिश सर्व्हे क्रमांक ३३मधील एकूण क्षेत्रफळ ५० एकर २३ गुंठे, तसेच २५७ सर्व्हेमधील ३५ एकर १४ गुंठे व २५९ मधील २४ एकर १५ गुंठे या जागा १९५६मध्ये महसूल विभागाने परस्पर म्हसरूळ ग्रामपंचायतीला वर्ग केलेल्या दस्तऐवजांच्या नोंदीवरून दिसतात. त्यावर वन अभिलेखात मोफत गुरे चारणे असा शिक्का मारलेला आढळतो. दरम्याच्या काळात येथील २५७ सर्व्हे क्रमांकाच्या जागेवर प्रचंड प्रमाणात खाणकाम करत गौणखनिज उत्खनन करण्यात आले.

कानेटकर उद्यान २७ एकर राखीव वनात

महापालिकेने गंगापूर गावाच्या शिवारात साकारलेले वसंत कानेटकर उद्यान हे संपूर्णपणे २७ एकर ९ गुंठे राखीव वनक्षेत्रात आहे. जुन्या ब्रिटिश सर्व्हे क्रमांक १५० व १५१मधील अनुक्रमे ११ एकर ५ गुंठे व १६ एकर ४ गुंठे इतकी जागा ही वनजमीन असल्याचे जुन्या वन अभिलेखातून दिसून येते. ही सर्व जागा वन विभागाच्या ताब्यात देण्याची मागणी करण्यात आली आहे.

चेहडी, शिंदे, संसारी गावातील वनजमिनींवर दावा

चेहेडी बुद्रुक येथील जुना सर्व्हे क्रमांक ५९ मधील २२ एकर ०.६६ गुंठे ही जागा पण महसूल विभागाने परस्पर ग्रामपंचायतीला वर्ग केली आहे. मात्र चेहडी बुद्रुक पालिका हद्दीत येते यामुळे ही जमीनदेखील हस्तांतरित करण्याची मागणी पत्रात केली आहे. तसेच शिंदे गावातील सर्व्हे क्रमांक ७० व संसारीमधील सर्व्हे क्रमांक ८५ हे बॉम्बे कॅसलच्या गॅझेट क्र.२७फ (दि.१ मार्च १८७९) नुसार राखीव वने म्हणून घोषित आहेत. १९७६च्या शासन परिपत्रकानुसार या राखीव वनजमिनी वन विभागाच्या ताब्यात देण्याची गरज आहे, अशी मागणी नाशिक उपविभागीय अधिकारी (प्रांत) यांच्याकडे सहायक वनसंरक्षक गणेशराव झोळे यांनी पत्राद्वारे केली आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: nashik municipal corporation created kanetkar garden on forest land and department wants it to back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.