नाशिक महापालिकेला ‘कोणी डॉक्टर देता का डॉक्टर?’

By Suyog.joshi | Published: January 25, 2024 11:03 AM2024-01-25T11:03:50+5:302024-01-25T11:04:31+5:30

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत मंजुरी मिळालेल्या १०५ आरोग्यवर्धिनी केंद्रांपैकी केवळ एकाचेच काम पूर्ण झाले आहे.

Nashik Municipal Corporation 'Does anyone give me a doctor?' | नाशिक महापालिकेला ‘कोणी डॉक्टर देता का डॉक्टर?’

नाशिक महापालिकेला ‘कोणी डॉक्टर देता का डॉक्टर?’

नाशिक : केंद्र शासनाच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या सहकार्यातून महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने शहरात उभारण्यात येणाऱ्या १०५ आरोग्य वर्धिनी केंद्रांसाठी ‘कोणी डॉक्टर देता का डॉक्टर‘ अशी स्थिती निर्माण झाली आहे. १०५ एमबीबीएस डॉक्टरांसाठी काढण्यात आलेल्या जागांसाठी केवळ सहाच जण मुलाखतीसाठी आल्याने आरोग्य विभागाच्यापुढे डॉक्टर भरतीचे नवे संकट उभे राहिले आहे.

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत मंजुरी मिळालेल्या १०५ आरोग्यवर्धिनी केंद्रांपैकी केवळ एकाचेच काम पूर्ण झाले आहे. मात्र सद्यस्थितीत आरोग्य विभागाकडून २० आरोग्यवर्धिनींचे काम पूर्ण झाले असून २० ठिकाणचे काम सुरू आहे. एका केंद्रासाठी एक एमबीबीएस डॉक्टर, एक स्टाफ नर्स, एक बहुउद्देशीय कर्मचारी, एक शिपाई, एक सिकयुरिटी अशी आवश्यकता असते.

मात्र कर्मचारी नसल्याने आरोग्यवर्धिनी कधी सुरू होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही कामे जसजशी जागा मिळेल तसतशी पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. मनपाच्या सेवेतील आरोग्य विभागात सन २००८ नंतर शासकीय भरती झालेली नाही.

आरोग्य विभागापुढे पेच
केंद्र शासनाच्या मागदर्शनानुसार नाशिक महापालिकेने शहरात १०५ ठिकाणी आरोग्यवर्धिनी आरोग्य केंद्रे उभारण्याची तयारी केली आहे. सर्व केंद्रे एकाच रंगसंगतीमध्ये उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी केंद्र सरकार १५ व्या वित्त आयोगामधून मनपाला ६५ कोटी ५० लाखांचा निधी उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे भविष्यात आरोग्यवर्धिनीमधून नाशिककरांना आरोग्य सेवा मिळणार आहे. देशातील जनतेचे जीवनमान उंचाविण्यासाठी, तसेच त्यांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी केंद्र सरकार विविध उपाययोजना राबवीत आहे. त्याअंतर्गत शहरी जनतेला छोट्या-मोठ्या आजारांवर तातडीने उपचार मिळावेत, यासाठी आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शासन निधीही उपलब्ध करून देणार आहे. पण सद्यस्थितीत डॉक्टरच उपलब्ध नसल्याने आरोग्य विभागापुढे पेच निर्माण झाला आहे.

येथील आरोग्यवर्धिनी केंद्र तयार
चुंचाळे घरकुल (अंबड), आझाद नगर (सातपूर), समाजमंदिर, महादेव वाडी (सातपूर), विधाते नगर (सातपूर), ज्येष्ठ नागरिक समाजमंदिर (सातपूर), महापालिका समाजमंदिर (नाशिक पश्चिम), जुनी शाळा, उत्कर्ष नगर (नाशिक पूर्व), एनएमसी बिल्डिंग, रंगारवाडा (नाशिक पश्चिम), समाज मंदिर, वाल्मिक नगर (पंचवटी), निलांजली हॉल, स्टेट बँक (सिडको, अयोध्या कॉलनी, मुरलीधरनगर (सिडको), जिजामाता व्यायामशाळा (नाशिकरोड), मनपा इमारत, घाडगे मळा (नाशिकरोड), मनपा व्यायाम शाळा, चाडेगाव (नाशिकरोड), मनपा व्यायामशाळा (चेहडी), नाना नानी पार्क, सौभाग्यनगर (सिडको), गोदावरी सोसायटी (नाशिकरोड), मनपा शाळा, विहितगाव.

Web Title: Nashik Municipal Corporation 'Does anyone give me a doctor?'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक