नाशिक मनपा : अग्निशामक दलाच्या चालकाने केला १५ हजार लिटर डिझेलचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 11:02 PM2018-03-08T23:02:46+5:302018-03-08T23:02:46+5:30
पावत्या शहरातील त्र्यंबक नाक्यावरील एका पेट्रोलपंपचालकाकडे जमा करून भोळे याने प्रत्यक्षरीत्या वाहनांमध्ये इंधन न भरता १५ हजार २८० लिटर डिझेल खरेदीचा घोटाळा करून परस्पर डिझेलची विल्हेवाट लावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे
नाशिक : अग्निशामक दलाचे बंब व वॉटर टॅँकरमध्ये इंधनाचा भरणा करण्याच्या नावाखाली सुमारे नऊ लाख ५२ हजार रुपयांचे डिझेल भरल्याचे दाखवून मनपाच्या मालेगाव स्टॅन्ड कार्यशाळेतून पावत्या घेऊन परस्पररीत्या बंबचालक संशयित रवींद्र अंकुश भोळे याने सुमारे १५ हजार लिटर डिझेलची विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अग्निशामक दलाच्या मुख्यालयात कर्तव्य बजावणा-या भोळे या बंबचालकाने २७ आॅक्टोबर २०१४ ते ७ मार्च २०१८ पर्यंत अग्निशामक दलाचे बंब व वॉटर टॅँकरमध्ये डिझेल भरणा केल्याचे वेळोवेळी दाखवून एकूण सुमारे १५ हजार २८० लिटर डिझेल वाहनांमध्ये भरल्याच्या पावत्या महापालिकेच्या कार्यशाळेतून घेतल्या. सदर पावत्या शहरातील त्र्यंबक नाक्यावरील एका पेट्रोलपंपचालकाकडे जमा करून भोळे याने प्रत्यक्षरीत्या वाहनांमध्ये इंधन न भरता १५ हजार २८० लिटर डिझेल खरेदीचा घोटाळा करून परस्पर डिझेलची विल्हेवाट लावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मुख्य अग्निशमन विभागाचे प्रमुख अनिल चुडामण महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात संशयित भोळेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०१४ सालापासून फसवणुकीचा प्रकार होऊनही सुमारे चार वर्षांनंतर बुधवारी (दि.७) भद्रकाली पोलीस ठाण्यात याप्रकरणी संशयिताविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला हे विशेष !
भोळे याने वाहनांमध्ये इंधन न भरता मनपाच्या नोंदवहीत कुठल्याही प्रकारच्या नोंदी न करता डिझेल खरेदी करून परस्पर अपहार केल्याचे उघड झाले आहे. भोळे यास वर्षभरापासून पालिकेच्या सेवेतून महाजन यांनी निलंबित केले आहे. त्याची विभागीय चौकशीदेखील सुरू असून दरम्यान, भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक व्ही. डी. गिरी करीत आहेत.