नाशिक महापालिका वाटणार ३ लाख जंतुनाशक गोळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 04:47 PM2018-08-11T16:47:17+5:302018-08-11T16:48:48+5:30
जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार भारतात १ ते १४ वयोगटातील जवळपास ६८ टक्के म्हणजे २४१ दशलक्ष मुले असून, त्यातील २८ टक्के मुलांना आतड्यांमध्ये वाढणारे परजीवी जंतापासून धोका होवू शकतो. जंताक्षयाचे प्रमुख कारण म्हणजे वैयक्तीक व परिसर स्वच्छतेचा अभाव असला
नाशिक : एक ते १९ वयोगटातील विद्यार्थी व किशोरवयीन मुलांच्या बौध्दीक व शारिरीक वाढीसाठी नाशिक महापालिकेच्यावतीने राष्टÑीय जंतनाशक आरोग्य दिनानिमित्त सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांना जंतुनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळा व महाविद्यालयीन युवकांचा समावेश करण्यात आला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार भारतात १ ते १४ वयोगटातील जवळपास ६८ टक्के म्हणजे २४१ दशलक्ष मुले असून, त्यातील २८ टक्के मुलांना आतड्यांमध्ये वाढणारे परजीवी जंतापासून धोका होवू शकतो. जंताक्षयाचे प्रमुख कारण म्हणजे वैयक्तीक व परिसर स्वच्छतेचा अभाव असला अथवा दुषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे सहजतेने होतो. बालकांमध्ये होणाऱ्या दिर्घकालीन कृमीदोष हा व्यापक आणि मुलांना कमजोर करणारा असून, त्यातून बौद्धीक व शारिरीक वाढ खुंटण्याची शक्यता असते. भारतात ५ वर्षाखालील मुला-मुलींमध्ये ७० टक्के रक्तक्षयाचे प्रमाण आढळते, महाराष्टÑात हेच पमाण ३४ टक्के असून, १५ ते १९ वर्षे वयोगटातील ५६ टक्के किशोरवयीन मुलींमध्ये व ३० टक्के किशोरवयीन मुलांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण आढळते. त्यामुळे राष्टÑीय जंतनाशक दिनानिमित्त सर्व मुला-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्रस्तरावर जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहेत.
नाशिक महापालिका क्षेत्रातील सर्व शासकीय शाळा, शासकीय अनुदानित शाळा, आश्रमशाळा, सर्व खासगी, अनुदानित शाळा, आर्र्मी स्कूल, सीबीएससीशाळा, सर्व खासगी इंग्रजी माध्यमिक शाळा, सुधारगृहे, मदरसे, मिशनरी स्कूल, गुरूकूल, संस्कार केंद्रे, सर्व अंगणवाडी, कनिष्ठ महाविद्यालयातील सुमारे ३ लाख ७ हजार २३३ विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.