नाशिक महापालिका : घरपट्टी वसुलीत आघाडी, पाणीपट्टी वसुलीत पिछाडी
By Suyog.joshi | Published: September 7, 2023 05:26 PM2023-09-07T17:26:21+5:302023-09-07T17:26:52+5:30
Nashik Municipal Corporation: महापालिका करसंकलन विभागाने घरपट्टी कर वसुलीत मोठी झेप घेतली असली तरी पाणीपट्टी वसुलीत मोठी पिछाडी पहायला मिळत आहे. शहरात दोन लाख अधिकृत नळ कनेक्शन धारक असून मागील तीन महिन्यात अवघ्या ७५ हजार वापरकर्त्यांना बिले वाटप झाली.
- सुयोग जोशी
नाशिक - महापालिका करसंकलन विभागाने घरपट्टी कर वसुलीत मोठी झेप घेतली असली तरी पाणीपट्टी वसुलीत मोठी पिछाडी पहायला मिळत आहे. शहरात दोन लाख अधिकृत नळ कनेक्शन धारक असून मागील तीन महिन्यात अवघ्या ७५ हजार वापरकर्त्यांना बिले वाटप झाली. त्याचा परिणाम वसुलीवर पहायला मिळत असून जेमतेम १८ कोटी पाणीपट्टी वसुली होऊ शकली आहे. दरम्यान, बिले वाटपाचे काम आऊटसोर्सिंगद्वारे केले जाणार असून हा प्रस्ताव मंजुरीसाठी महासभेवर ठेवण्यात आला आहे. आऊटसोर्सिंगनंतरच पाणी बिले वाटपाला गती मिळण्याची चिन्हे आहेत.
महापालिकेची आर्थिक भिस्त ही सर्वाधिक करसंकलन विभागावर असते. गतवर्षी या विभागाने १८८ कोटी मालमत्ता कर तर ६६ कोटी पाणीपट्टी वसुली केली होती.यंदाही आयुक्तांनी दोनशे कोटी मालमत्ता कर व ७५ कोटी पाणीपट्टी वसुलीचे उदिष्ट दिले आहे. या विभागाने नवीन आर्थिक वर्षात सुरवातीचे तीन महिने मालमत्ता कराचे देयके वाटप केले. वेळेवर देयके नागरिकांच्या हाती पडल्याने मागील पाच महिन्यात ११८ कोटी मालमत्ता कर वसूल झाला. परंतु मनुष्यबळाची कमतरता व उशीराने पाणी बिले वाटपाला सुरुवात केल्याने वसुली थंडावली आहे. जवळपास दोन लाख नळ कनेक्शनधारकांपैकी अवघे ७५ हजार जणांना बील वाटप झाले. त्यामुळे पाणीपट्टी वसुलीला अपेक्षित गती मिळाली नसल्याचे चित्र आहे. आतापर्यंत अवघी १८ कोटी पाणीपट्टी वसूल झाली असून ५७ कोटी वसुल करण्याचे मोठे टास्क करसंकलन विभागापुढे आहे.