नाशकात अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठत कडकडीत बंद ; रस्त्यांवर शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:01 PM2021-03-13T17:01:51+5:302021-03-13T17:13:48+5:30
कोरोना संसर्गाचा धोका पुन्हा वाढू लागल्याने प्रशासनाने खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता शाळा महाविद्यालयांसबतच अन्य सर्व दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाच्या आदेशाला शहरासह उपनगरांमधूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये शनिवारी (दि.१३) कडकडीत बंद पाळण्यात आला.
नाशिक : शहरासह राज्यातील विविध भागात कोरोना संसर्गाचा धोका पुन्हा वाढू लागल्याने प्रशासनाने खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता शाळा महाविद्यालयांसबतच अन्य सर्व दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाच्या आदेशाला शहरासह उपनगरांमधूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये शनिवारी (दि.१३) कडकडीत बंद पाळण्यात आला.
कोरोनाचा वाढता प्रभाव नियंत्रित करण्यासाठी शनिवारी(दि.१३) व रविवारी (दि.१४) अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व दुकाने व व्यावासायिक आस्थापना पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शनिवारी (दि.१३) शहरातील शहरातील शालीमार, मेनरोड, दहीपूल, रविवार कारंजा, अशोकस्तंभ, कॉलेजरोड, गंगापूररोड परिसरातील इलेक्ट्रीक, कपडे, सौदर्य प्रसाधने यासारखी व्यावसायिक दुकाने व मॉल्स पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती.
किराणा दुकानांसह डेअरी उत्पादने, भाजी विक्रेते, फळ विक्रेते व खानपानाचे हॉटेल, उपहारगृह वेळेचे निर्बंध पाळून सुरू असल्याचे दिसून आले. मात्र, यात काही प्रवाशी स्थानकांच्या परिसरातील चहा व वडापावचे स्टॉल सुरू असल्याने याठिकाणी ग्राहकांची वर्दळ दिसून आले. दरम्यान, प्रशासनाच्या आदेशाला शहरातील मेनरोड, दहीपूल, रविवार कारंडा, शालीमार, कॉलेजरोड, गंगापूररोड परिसरासह पंचवटी,गंगापूर, सातपूर, अंबड, सिडको, गोविंदनगर, इंदिरानगर, मुंबईनाका, द्वारका ,उपनगरसह नाशिकरोड व देवळाली भागातील व्यावसायिकांनी प्रतिसाद दुकाने बंद ठेवली होती.
मास्कशिवाय वावर
कोरोनाचे संकट वाढत असताना एकीकडे प्रशासनाकडून शहरासह जिल्हाभरात कडक कोरोना प्रतिबंधात्मक नियम लागू करण्यात आले आहे. तर दुसरीकडे शहरातच एमजी रोड. मेनरोड सह अन्य काही भागांमध्ये तरुण मंडळी विनामास्क फिरताना, कट्यांवर गप्पा मारताना, दिसून आले. शहरातीतल रस्त्यांवरही अनेक दुचाकी चालकांनी हेल्मेट अथवा मास्कचा वापर केला नसल्याचे चित्र पाहायला मिळाले.
आरोग्य विभागाकडून जनजागृती
कोरोना संसर्ग वाढल्याने नागरिकांनी विनाकारण घराबाहेर करू नये तसेच शनिवार व रविवारच्या दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यावसायिकांनी दुकाने उघडू नये अन्यथा कारवाई केली जाईल अशा सूचना महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून फिरत्या वाहनांमधून करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे घंटागाडी व निर्जंतुकीकरणासाठी फिरणाऱ्या वाहनांमधूनही कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयी जनजागृती करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे शहरातील सीबीएस, मेहर सिग्नल भागात ध्वनीक्षेपकांद्वारे कोरोना प्रतिबंधात्कम खबरदारी घेण्याविषयी सुचना करण्यात येत आहे.