कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी नाशिक मनपा सज्ज : डॉ. बापूसाहेब नागरगोजे
By संजय पाठक | Published: November 19, 2020 11:14 PM2020-11-19T23:14:41+5:302020-11-19T23:18:04+5:30
नाशिक- कोरोनाची संभाव्य दुसरी लाट दिवाळीनंतर येणार असल्याचे सांगितले जात आहे. जागतिक तज्ज्ञांच्या या माहितीमुळे नाशिक महापालिकेने वैद्यकीय व्यवस्था पूर्णत: सज्ज ठेवली आहे. ७०० कर्मचाऱ्यांना मुदतवाढ दिली असून, दहा हजार अँटिजेन टेस्ट किट्स मागविल्या आहेत. शिवाय खासगी रुग्णालयातील कोरोनाबाधितांच्या खाटा सुरक्षित ठेवल्या आहेत, अशी माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी लोकमतशी बोलताना दिली.

नाशिकमध्ये सध्या कोरोना बाधितांची संख्या मर्यादित असून, मृत्युदरदेखील घटला आहे. मात्र अशा स्थितीत दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेने प्रभावी यंत्रणा उभारली आहे. त्याबाबत डॉ. नागरगोजे यांच्याशी साधलेला संवाद..
प्रश्न- कोराेनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याबाबत महापालिकेने काय तयारी केली आहे?
डॉ. नागरगोजे- कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते काय याबाबत शासन स्तरावर दोन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये चर्चा झाली. त्यानुसार शासनाने महापालिकांना त्यांच्या स्तरावर तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्याला अनुसरून महापालिकेने कंत्राटी स्वरूपात घेतलेलेल्या सुमारे ७०० कर्मचाऱ्यांना गेल्याच महिन्यात तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्याच प्रमाणे दहा हजार अँटिजेन टेस्ट किट्स मागविल्या आहेत.
प्रश्न- कोरोनाच्या पहिल्या लाटेत रुग्णालयांची अडचण भासली होती?
डॉ. नागरगोजे- होय, त्या अनुषंगानेच नाशिक महापालिकेने सज्जता ठेवली आहे. खासगी रुग्णालयात महापालिकेच्या माध्यमातून जाणाऱ्या कोरोनाबाधितांसाठी आरक्षित खाटा कायम ठेवल्या आहेत. नाशिक महापालिकेचे डॉ. झाकीर हुसेन, बिटको आणि न्यू बिटको ही रुग्णालये कायम आहेतच तेथे ऑक्सिजन टँक बसविण्याचे कामदेखील सुरू आहे. याशिवाय कोविड केअर सेंटर ‘जैसे थे’ ठेवण्यात आली आहेत.
प्रश्न- ही लाट थोपवण्यासाठी आणखी काय उपाय आहेत?
डॉ. नागरगोजे- मुळात नागरिकांनी आरोग्य नियमांचे पालन करण्याची गरज आहे. आता सण असो वा अन्य काही बाहेर गर्दी टाळावी तसेच मास्क, हँड सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतराचे पालन केले पाहिजे. यानंतरही कोरोना संसर्ग झालाच तर महापालिका आहेच, परंतु मुळातच अशी वेळ येऊ नये यासाठी सर्वांनीच आरोग्य नियमांचे पालन केलेे पाहिजे.
मुलाखत- संजय पाठक