महापालिकेत ना येण्याची वेळ, ना जाण्याची; दुपारच्या जेवणासाठी अनेकांची सुट्टी दोन तास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 06:41 PM2021-12-02T18:41:03+5:302021-12-02T18:45:42+5:30
नाशिक - महापालिकेच्या मुख्यालय आणि विभागीय कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात आली असली तरी मध्यंतरीच्या काळात काय हा मोठा प्रश्न ...
नाशिक - महापालिकेच्या मुख्यालय आणि विभागीय कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात आली असली तरी मध्यंतरीच्या काळात काय हा मोठा प्रश्न आहे. त्यातच मुख्यालयासह अन्यत्रही भोजनाची सुटी अर्धा तास असताना अनेक विभागातील अधिकारी तसेच कर्मचारी दुपारी एक किंवा दीड वाजता गायब झाल्यास थेट तीन ते चार वाजेनंतरच भेटतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे काम मात्र खोळंबत असते.
महापालिकेशी सर्वाधिक संपर्क हा सर्वसामान्य नागरिकांशी येतो. मुख्यालयात नगरसेवक, राजकीय नेते आणि ठेकेदारवगळता सर्वसामान्य नागरिकांना भेटण्याची वेळ दुपारी साडेचारनंतरचीच असते. परंतु या नंतरही अनेक अधिकारी, अभियंते तसेच कर्मचारी जागेवर नसतात. त्यामुळे येणाऱ्यांच्या वेळेचा अपव्यय होतो. मुळात दुपारच्या भोजनाची वेळ सर्व शासकीय कार्यालयांसाठी सारखीच आहे. मात्र, महापालिकेत बाहेरील काम किंवा अन्य कामे सांगून अनेक कर्मचारी गायब असतात.
दुपारच्या भोजनासाठी अनेकजण घरी
- भोजनाच्या वेळेचे एकंदर गणित बघता, कर्मचाऱ्यांनी भोजनासाठी डबा कार्यालयात आणून तेथेच भोजन केले तर अधिक उपयुक्त ठरू शकते.
- अनेक विभागातील कर्मचारी घराजवळच राहतात असे सांगून भोजनासाठी गायब झाल्यानंतर पुन्हा वेळेवर येत नाहीत.
साहेबांनी सांगितले, साइटवर गेलो
नगररचना विभागात दुपारनंतरदेखील अनेकदा कर्मचारी भेटत नाहीत. अनेकांना वरिष्ठ अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी सांगितलेले काम करण्यासासाठी जावे लागते.
- नगररचना आणि अभियांत्रिकीशी संबंधित अनेक कर्मचारी साइटवर गेल्याचे मुख्यालयात गेल्यानंतर सांगण्यात येते. मात्र, त्यामुळे नागरिकांना अकारण हेलपाटा पडतो.
माझे नगररचना विभागाशी संबंधित काम आहे. मात्र, गेल्या महिनाभरापासून तेथे राेज जाऊनही उपयोग होत नाही. इंजिनिअर भेटत नाहीत. सध्या वॉर्डरचनेची कामे सुरू आहेत, त्यामुळे ते कामात असल्याचे सांगितले जाते. सकाळी महापालिकेत प्रवेश नाही, सायंकाळी अधिकारी भेटत नाही.
- दिवाकर शिरभाते, नाशिक
काहीही कामासाठी महापालिकेत गेल्यानंतर अधिकारी, कर्मचारी न भेटणे हे कायमच झाले. दोन ते तीन चकरा मारल्याशिवाय काम होत नाही. कार्यालयीन कामाची वेळ निश्चित असताना कर्मचारी जातात कोठे?
- तुकाराम शिदोरे, पंचवटी
प्रत्येक कार्यालयात दोन ते चार कर्मचारी हजर
नाशिक शहर कार्यालयात दीड ते दोन भोजनाची वेळ असली तरी अनेक कर्मचारी महापालिकेच्या वेगवेगळ्या मजल्यावर भोजनानंतर शतपावली करताना आढळतात. कार्यालय सुरू झाल्यानंतर एकेक करीत येण्यास सुरुवात होत असली तरी प्रत्यक्ष वेळेत प्रत्येक कार्यालयात दोन ते चार कर्मचारीच हजर असतात.
कामावर येण्याची आणि जाण्याची वेळ ठरली आहे. भोजनाच्या सुटीतही वेळेत आले पाहिजे, तसे न झाल्यास संबंधित खातेप्रमुखांनी तपासणी करून कारवाई केली पाहिजे.
- मनोज घोडे पाटील, उपआयुक्त प्रशासन