नाशिक महापालिकेची जलवाहिनी फुटली; शहरातील ७५ टक्के पाणीपुरवठा बंद
By संजय पाठक | Updated: June 17, 2024 13:27 IST2024-06-17T13:27:06+5:302024-06-17T13:27:27+5:30
नाशिक शहराला गंगापूर आणि मुकणे धरणातून प्रामुख्याने पाणी पुरवठा होतो.

नाशिक महापालिकेची जलवाहिनी फुटली; शहरातील ७५ टक्के पाणीपुरवठा बंद
नाशिक - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून येणारी ७०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी आज सकाळी फुटल्याने नाशिक शहरातील ७५ टक्के भागाचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. महापालिकेच्यावतीने गळती बंद करण्याचे काम युद्धपातळीवर कामकाज सुरू करण्यात आले असले तरी दुरुस्तीला जलवाहिनीच्या सहा ते सात तास इतका कालावधी लागणार असल्याने सर्व भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
नाशिक शहराला गंगापूर आणि मुकणे धरणातून प्रामुख्याने पाणी पुरवठा होतो. गंगापूर धरणातून शिवाजी नगर येथील जलशुद्धीकरण केंद्रात रॉ वॉटर पाठवले जाते आणि तेथून शुद्ध पाणी ७०० मिमी जलवाहिनीद्वारे शहरात पुरवले जाते. आज सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास गंगापूर रोडवर बळवंत नगर येथे जलवाहिनी फुटल्याने पाणी पुरवठा बंद झाला आहे.
नाशिक महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने तात्काळ शिवाजीनगर येथील पाणी पुरवठा बंद केला आणि दुरूस्तीचे काम सुरू केले आहे. मात्र, दुरूस्तीला किमान सहा ते सात तास वेळ लागणार आहे. त्यानंतर पाणी पुरवठा सुरू होईल, असे मनपाच्या पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता संजय अग्रवाल यांनी सांगितले.
केवळ मुकणे धरणातून पाणीपुरवठा ज्या भागात होतो, तो सिडको, पाथर्डी, इंदिरा नगर द्वारका या परिसरातच पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. नाशिक रोड येथील काही भागात दारणा नदीतून पाणी घेतले जाते. त्यामुळे नाशिक रोडच्या काही भागातही पाणीपुरवठा सुरळीत राहणार आहे.मात्र, सातपूर, पश्चिम आणि पूर्व नाशिकचा काही भाग पंचवटी या सर्व भागांमध्ये पाणीपुरवठा अनिश्चित काळासाठी बंद राहणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अध्यक्ष अभियंता संजय अग्रवाल यांनी दिली.