नाशिक महापालिकेचे ४१ प्रभाग होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:17 AM2021-09-23T04:17:53+5:302021-09-23T04:17:53+5:30

नाशिक महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. त्यासाठी गेल्याच महिन्यात एक सदस्यीय प्रभाग यानुसार प्रारूप प्रभाग रचनेचे काम सुरू ...

Nashik Municipal Corporation will have 41 wards | नाशिक महापालिकेचे ४१ प्रभाग होणार

नाशिक महापालिकेचे ४१ प्रभाग होणार

Next

नाशिक महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. त्यासाठी गेल्याच महिन्यात एक सदस्यीय प्रभाग यानुसार प्रारूप प्रभाग रचनेचे काम सुरू करण्यात आले हेाते. मात्र या दरम्यानच मुंबई वगळता राज्यातील सर्वच महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. नंतर अखेरीस बुधवारी (दि.२२) राज्य शासनाने निर्णय घोषित केला. या निर्णयानुसार तीन सदस्यीय प्रभाग पद्धती अस्तित्वात येणार आहे. सध्याची प्रभाग रचना २०११ मध्ये झालेल्या जनगणनेवर आधारित आहे. कोरोनामुळे नवीन जनगणना न झाल्याने २०११ च्या जनगणनेनुसार प्रभाग रचना होणार आहे. एक सदस्यीय प्रभाग पद्धतीत नगरसेवकांची संख्या १२२ राहणार असल्याने त्यानुसार १२२ प्रभाग होणार होते; मात्र आता त्रिसदस्यीय प्रभाग रचना असल्याने ४१ प्रभाग होणार आहेत. त्यातील ४० प्रभागात तीन सदस्य असतील तर शेवटच्या प्रभागात दोन नगरसेवक असतील. तसेच प्रत्येक प्रभागात साधारणत: ३६ हजार लाेकसंख्या असणार आहे. त्यामुळे उमेदवारांना मात्र आटापिटा करावा लागणार आहे.

या प्रभाग रचनेचे सर्वच पक्षांनी स्वागत केले आहे. शिवसेना आणि भाजपाने तर काहीही प्रभाग रचना झाली तरी सर्वच जागांवर स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले.

कोट..

जर बहुसदस्यीय प्रभाग पद्धती ठेवायची होती तर मध्यंतरी एक सदस्यीय प्रभागाचा घोळ घालण्याची गरज नव्हती. कोणत्याही प्रकारची प्रभाग रचना असली तरी त्याला सामोरे जाण्याची भाजपाची तयारी होतीच.

- गिरीश पालवे, शहराध्यक्ष, भाजपा

कोट...

राज्य शासनाचा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे. शिवसेनेने १२२ जागांवर उमेदवार देण्याची तयारी पूर्ण केली आहे. त्यामुळे हा निर्णय योग्यच असून पक्षाला फायदा होईल. पक्षाने स्वबळावर लढण्याची तयारी केली होती आघाडीचा निर्णय अद्याप झालेला नाही.

- सुधाकर बडगुजर, महानगर प्रमुख शिवसेना

कोट..

राज्य शासनाच्या निर्णयामुळे सगळ्या घटकांना प्रतिनिधीत्व मिळेल. एक प्रभाग असेल तर मक्तेदारी वाढते. तसेच अपक्षांची संख्याही वाढते. बहुसदस्यीयमुळे किमान काम करणाऱ्या उमेदवारांना संधी मिळेल.

- डॉ. हेमलता पाटील, ज्येष्ठ नगरसेविका कॉंग्रेस

कोट..

बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने महिला आणि अन्य उमेदवारांना संधी मिळत असल्याने अशाप्रकारची रचना करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला, त्याचे स्वागत आहे

- रंजन ठाकरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी

केाट..

राज्य शासनाच्या निर्णयाचे स्वागत करतो. आता आमच्या तयारीला लागण्यास मोकळे झालो आहेत.

- गुरुमितसिंग बग्गा, अपक्ष गटनेता

Web Title: Nashik Municipal Corporation will have 41 wards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.