कोरोना संदर्भात नाशिक मनपा करणार जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 03:18 PM2020-02-07T15:18:23+5:302020-02-07T15:20:07+5:30
नाशिक : चीनमधून पसरलेल्या कोरोना या संसर्गजन्य आजाराबाबत शासनाच्या आदेशानुसार नाशिक शहरातही दक्षता घेण्यात येत असून, जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वतंत्र (विलगीकरण) कक्ष सुरू करण्यात आला आहे. लवकरच यासंदर्भात प्रबोधन करण्यात येणार आहे.
नाशिक: चीनमधून पसरलेल्या कोरोना या संसर्गजन्य आजाराबाबत शासनाच्या आदेशानुसार नाशिक शहरातही दक्षता घेण्यात येत असून, जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वतंत्र (विलगीकरण) कक्ष सुरू करण्यात आला आहे. लवकरच यासंदर्भात प्रबोधन करण्यात येणार आहे.
स्थायी समितीच्या गुरुवारी (दि.७) झालेल्या बैठकीत यासंदर्भात आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन रावते यांनी ही माहिती दिली. कोरोना संदर्भात शासनाच्या निर्देशानुसार आरोग्य उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे तसेच जिल्हा शल्यचिकित्सक सुरेश जगदाळे यांच्यासह अन्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली आहे. नाशिक शहर किंवा जिल्ह्यात अद्याप यासंदर्भात कोणताही रुग्ण आढळलेला नाही. मात्र, तरीही जिल्हा शासकीय रुग्णालयात यासंदर्भात स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे.
रोगाची लक्षणे आणि अन्य माहिती देण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या विद्यमाने वैद्यकीय व्यावसायिकांची कार्यशाळा घेण्यात आली असून, त्यांनाही दक्षता घेण्याचे सांगण्यात आले आहे. संशयित रुग्ण आढळलाच तर त्याचा स्वॅप घेतल्यानंतर तो मुंबई येथे चाचणीसाठी पाठविण्यात येईल आणि तेथील शासकीय प्रयोगशाळेत कोरोना असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित रुग्णावर त्यादृष्टीने उपचार करण्यात येतील, असेही रावते यांनी सांगितले. यासंदर्भात समीर कांबळे, अशोक मुर्तडक तसेच अन्य सदस्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. त्याला डॉ. रावते यांनी उत्तरे दिली. अनेक नागरिकांचे नातेवाईक आणि मित्रपरिवार नोकरी-व्यवसाय किंवा अन्य कारणाने कोणी चीनमध्ये गेले असतील तर त्यादृष्टीनेदेखील काळजी घेतली पाहिजे, असेही यावेळी सभापती उद्धव निमसे यांनी सांगितले.
इन्फो...
ही आहेत रोगाची लक्षणे...
घसा खवखवणे, सर्दी पडसे आणि अति ताप करणे आणि निमोनिया होणे या स्वरूपाची लक्षणे असतात. अशी कोणतीही लक्षणे आढळल्यास काळजी घेऊन तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.