नाशिक महापालिकेपुढे तीन महिन्यांत ४३ कोटी रूपये घरपट्टी वसुलीचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 01:35 PM2018-01-02T13:35:27+5:302018-01-02T13:37:02+5:30
नऊ महिन्यांत ६२ कोटी वसुली : थकबाकीदारांना नोटीसा बजावण्याचे काम सुरू
नाशिक - महापालिकेने सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात १०५ कोटी रुपये घरपट्टी वसुलीचे उद्दिष्टय समोर ठेवले असले तरी नऊ महिन्यांत ६२ कोटी ६३ लाख रुपये घरपट्टी वसुल होऊ शकली आहे. येत्या तीन महिन्यांत ४३ कोटी रुपये वसुलीचे आव्हान महापालिकेसमोर असून त्यासाठी २ हजार रुपयांच्या वर थकबाकी असलेल्या मिळकतधारकांना नोटीसा बजावण्याचे काम सुरू केले आहे.
आर्थिक परिस्थितीशी झगडणाºया महापालिकेने घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. दि. १ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत ६२ कोटी ६३ लाख रुपये घरपट्टी वसुल झालेली आहे. १ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत ५९ कोटी ७१ लाख रूपये वसुली झाली होती. सन २०१६ च्या तुलनेत घरपट्टी वसुलीत ३ कोटी रुपयांनी वाढ होऊ शकली आहे. महापालिकेला येत्या तीन महिन्यात उद्दिष्टय गाठण्यासाठी मोठी मेहनत करावी लागणार आहे. थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने २ हजार रुपयांच्या वर थकबाकी असलेल्या मिळकतधारकांना नोटीसा बजावण्याचे काम सुरू केले आहे. त्यात नाशिक पूर्व विभागातील १८ हजार ९१३, नाशिकरोड विभागातील १५ हजार ४१९, सातपूर विभागातील ११ हजार ४१६, पश्चिम विभागातील ७ हजार ५०५, पंचवटी विभागातील १४ हजार ३५० तर सिडकोतील सुमारे २० हजार मिळकतधारकांचा समावेश आहे. मागील वर्षी ऐन निवडणुकीच्या तोंडावर महापालिकेने बड्या थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल वाजवत अनोख्या पद्धतीने वसुली केली होती. यंदा, मात्र महापालिकेने त्याबाबत मवाळ धोरण स्वीकारल्याचे दिसून येते.
पाणीपट्टीत १० कोटींची वाढ
महापालिकेने पाणीपट्टीत २०१६ च्या तुलनेत १० कोटी रुपये जादा वसुली केली आहे. सन २०१६ मध्ये १७ कोटी २८ लाख रुपये तर सन २०१७ मध्ये २७ कोटी ७१ लाख रुपये पाणीपट्टी वसुल झाली आहे. महापालिकेने सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात ४२ कोटी रुपये पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्टय ठेवले आहे. दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून शहरात अनेक भागात ग्राहकांना पाणीपट्टीची बिलेच जाऊन पोहोचलेली नाहीत.त्यामुळे पाणीपट्टी वसुलीचेही आव्हान महापालिकेसमोर आहे.