नाशिक महापालिकेची सिटी लिंक सेवा सलग दुसऱ्या दिवशी बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 10:51 AM2023-08-05T10:51:52+5:302023-08-05T10:51:58+5:30
ठेकेदाराने जून महिन्याचे वेतन न दिल्याने कालपासून काम बंद आंदोलन
संदीप झिरवाळ, नाशिक: महापालिकेची सिटीलिंक बस सेवा आज सलग दुसऱ्या दिवशीही सकाळपासून बंद आहे. त्यामुळे प्रवाशांचे आणि विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. या बस सेवेसाठी ठेकेदारामार्फत 500 वाहक घेण्यात आले आहेत मात्र ठेकेदाराने जून महिन्याचे वेतन न दिल्याने हा कालपासून वाहकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. काल सिटी लिंक व्यवस्थापनामार्फत ठेकेदाराने विविध मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले खरे मात्र अंतिम निर्णय होई पर्यंत बस सेवा सुरू होणार नाही असा निर्णय या वाचकांच्या युनियनने जाहीर केला. त्यामुळे आजही बससेवा सुरू केली नव्हती.
सिटीलिंक वाहक पुरवण्यासाठी ठेकेदार कंपनीच्या दोन भागीदारात वाद असून त्यांच्यातील आपसी वादामुळे सिटीलिंक वाहक भरडला जात असल्याचे काही वाहकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. दरम्यान यावर्षी आठ महिन्यात तब्बल पाच वेळा सिटीलिंक बससेवेला ब्रेक लागल्याने नाशिक महानगरपालिका प्रशासनाचे लाखो रुपयांचे नुकसान तर झालेच शिवाय सिटीलिंकने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाहतूक फटका बसला. सिटीलिंक बससेवा बंद असल्याने सलग दुसऱ्या दिवशी नोकरदार, शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय झाली होती बस बंदमुळे अनेक विद्यार्थ्यांनी शाळेला दांडी मारली होती.