नाशिकचे पालिका आयुक्त तुकाराम मुंढेंपुढे उत्पन्नवाढीचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 02:56 PM2018-02-13T14:56:13+5:302018-02-13T15:00:35+5:30

कसोटीचा काळ : मूलभूत सोयीसुविधांबाबत जनतेच्या अपेक्षा

 Nashik Municipal Corporation's Commissioner Tukaram Muni | नाशिकचे पालिका आयुक्त तुकाराम मुंढेंपुढे उत्पन्नवाढीचे आव्हान

नाशिकचे पालिका आयुक्त तुकाराम मुंढेंपुढे उत्पन्नवाढीचे आव्हान

Next
ठळक मुद्देसप्ताहात महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर होण्याची शक्यता असून, त्यात पुरवणी यादीत ‘मुंढे पॅटर्न’कडे लक्षमुंढे यांना अपु-या मनुष्यबळावर उत्पन्न वाढविण्याचे मोठे आव्हान

नाशिक : कोठेही आपला कार्यकाळ पूर्ण न करणारे आणि बारा वर्षांत दहा वेळा बदली झालेले तुकाराम मुंढे यांनी महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्याने त्यांच्याविषयी निर्माण झालेल्या प्रसिद्धीवलयामुळे नाशिककरांच्याही अपेक्षा उंचावल्या आहेत. प्रशासकीय कामकाजात शिस्त आणण्याचा विडा आयुक्तांनी पहिल्या दिवसापासूनच उचलला असला तरी महापालिकेची बिघडलेली आर्थिक घडी बसविण्याचे मोठे आव्हान मुंढे यांच्यासमोर आहे. या सप्ताहात महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर होण्याची शक्यता असून, त्यात पुरवणी यादीत ‘मुंढे पॅटर्न’कडे लक्ष लागून असणार आहे.
तुकाराम मुंढे यांची आजवरची कारकीर्द गाजलेली आहे. सत्ताधा-यांविरुद्ध संघर्षामुळे त्यांचा कुठेही टिकाव लागू शकलेला नाही. त्यामुळे त्यांना बारा वर्षांत दहा वेळा बदलीची बक्षिसी मिळालेली आहे. मुंढे यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी खुद्द मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून नियुक्ती केली असल्याने मुंढे यांच्याकडून सत्ताधारी भाजपाबरोबरच नाशिककरांच्याही अपेक्षा उंचावल्या आहेत. महापालिकेचे उत्पन्न साधारणत: ११०० ते १२०० कोटी रुपयांपर्यंत आहे मात्र, दायित्व त्याहून अधिक आहे. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक मावळते आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी तयार केलेले असून, ते १४७५ कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले आहे. कृष्ण यांनी सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी १४१० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. आता तेच सुधारित अंदाजपत्रक १४५१ कोटी रुपयांवर जाऊन पोहोचले आहे. कृष्ण यांनी आपल्या कारकिर्दीत उत्पन्न वाढीसाठी घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकीच्या वसुलीवर मोठा भर दिला होता. याशिवाय, नगररचना विभागातही सुसूत्रता आणल्याने विकास शुल्काच्या माध्यमातून मिळणा-या उत्पन्नातही वाढ झालेली होती. मात्र, दिवसेंदिवस महापालिकेला उत्पन्न कमी आणि दायित्व जास्त याचा सामना करावा लागतो आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांसाठी मनपाचा देण्यात येणारा हिस्सा, स्मार्ट सिटीचा हिस्सा यामुळे भांडवली कामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध होऊ शकत नाही. त्यातच येत्या अंदाजपत्रकात शहर बससेवा ताब्यात घेण्यासाठी ७० कोटी रुपयांची तरतूद करून ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे मुंढे यांना अपु-या मनुष्यबळावर उत्पन्न वाढविण्याचे मोठे आव्हान असणार आहे. महापालिकेचे जाहिरात धोरण शासनाकडे मान्यतेसाठी पडून आहे. याशिवाय, विकास नियंत्रण नियमावलीनुसार ६ आणि ७.५० मीटरच्या रस्त्यावरील बांधकाम परवानगीचा प्रश्न अजून सुटलेला नाही. त्यामुळेही उत्पन्नाचा गाडा अडलेला आहे.
घरपट्टी-पाणीपट्टी वाढीचे संकेत
मावळते आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी आपल्या अंदाजपत्रकात घरपट्टी व पाणीपट्टी दरवाढीची सूचना केलेली आहे. त्यामुळे महासभेतही आयुक्तांकडून करवाढीचा प्रस्ताव सादर होण्याची शक्यता आहे. आता मुंढे यांनी केवळ मुख्यमंत्र्यांचाच अजेंडा राबविण्याचे ठरविले असल्याने महासभेतही घरपट्टी-पाणीपट्टी दरवाढीला सत्ताधारी भाजपाकडून मंजुरी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title:  Nashik Municipal Corporation's Commissioner Tukaram Muni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.