नाशिक महापालिकेतील नगरसेवकांचा ‘धावपळ’वार, मुंढेंचा घेतला धसका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 07:10 PM2018-02-08T19:10:31+5:302018-02-08T19:11:41+5:30
मुख्यालयात गर्दी : फाईलींवर स्वाक्षरीसाठी पायधूळ
नाशिक - महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे हे शुक्रवारी (दि.९) पदाची सूत्रे हाती घेणार असल्याने गुरुवारी (दि.८) दिवसभर पदाधिका-यांसह नगरसेवकांची प्रलंबित फायलींवर मावळते आयुक्त अभिषेक कृष्ण यांची स्वाक्षरी घेण्यासाठी धावपळ दिसून आली. मात्र, आयुक्तांनी स्वाक्ष-या करण्याचे टाळल्याचे सांगितले जाते. त्यामुळे, अनेकांना चिंताक्रांत चेह-यांनी मुख्यालयातून माघारी परतावे लागल्याची चर्चा आहे.
महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांची मुंबई एमआयडीसी येथे सह मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झालेली आहे तर त्यांच्या जागेवर बदलून आलेले पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे हे शुक्रवारी (दि.९) सकाळी ११ वाजेच्या सुमारास आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. त्यामुळे, मावळते आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी गुरुवारी (दि.८) नेहमीप्रमाणे महापालिका मुख्यालयात येत आपल्या नियोजित कामांवर भर दिला. यावेळी, सत्ताधा-यांसह विरोधी पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक तसेच अधिकारी यांचेसह विविध क्षेत्रातील नागरिकांनीही आयुक्तांची भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. एकीकडे आयुक्तांची भेट घेण्याचे सत्र पार पडत असतानाच आयुक्तांकडे प्रलंबित असलेल्या फाईलींवर स्वाक्ष-या होण्यासाठी अनेक नगरसेवकांची धावपळ सुरू होती. काही नगरसेवक खातेप्रमुखांसह अतिरिक्त आयुक्तांकडे चकरा मारत प्रलंबित फाईलींचा निपटरा करण्यासाठी आग्रह धरताना दिसून येत होते. नवीन आयुक्त आल्यास प्रलंबित फाईलींचा प्रवास पुन्हा लांबण्याची भीती असल्याने बव्हंशी नगरसेवकांनी मुख्यालयात गुरुवारी हजेरी लावली. परंतु, आयुक्तांनी ब-याच फाईलींवर स्वाक्ष-या केल्या नसल्याचे समजते. त्यामुळे, संबंधित नगरसेवकांच्या पोटात गोळा उठला आहे. नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून कामांची पुनर्तपासणी शक्य असल्याने फाईलींचा प्रवास लांबण्याची शंका व्यक्त केली जात आहे.
नगरसेवकांची अडचण
आयुक्त अभिषेक कृष्ण यांची मुंबई एमआयडीसीमध्ये सह मुख्य कार्यकारी अधिकारी या महत्वाच्या पदावर नियुक्ती झालेली आहे. त्यांच्याकडे विदर्भातील एमआयडीसी विभागासह आयटीपार्क, वाईनपार्क या प्रकल्पांची सूत्रे देण्यात आलेली आहेत. वास्तविक कृष्ण यांची मोठ्या पदावर बदली झालेली आहे. गुरुवारी आयुक्तांना भेटण्यासाठी पदाधिका-यांसह नगरसेवकांनी गर्दी केली होती. परंतु, आयुक्तांच्या दालनात जाऊन केवळ त्यांच्याप्रती सहानुभूती दाखविण्यापलिकडे भाव व्यक्त करता येत नव्हता आणि मोठ्या पदावर बदली झाली म्हणून त्यांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छाही देता येत नव्हत्या.