नाशिक महापालिकेत उपआयुक्तांसह अधिका-यांचे खातेपालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 07:43 PM2018-02-21T19:43:16+5:302018-02-21T19:44:21+5:30
फडोळ यांच्याकडील खाती काढली : लेखापरीक्षकाकडे प्रशासनाचा भार
नाशिक - महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रशासकीय सोयीचा भाग म्हणून उपआयुक्त दर्जाच्या अधिका-यांचे खातेपालट केले असून मुख्य लेखापरीक्षक महेश बच्छाव यांच्याकडे प्रशासनाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. प्रशासन उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांच्याकडे महिला बालकल्याणसह अन्य खाती देण्यात आली आहेत.
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुधवारी (दि.२१) सहा अधिका-यांकडील खातेपालटासंबंधीचे आदेश जारी केले. त्यानुसार, प्रशासन उपआयुक्तपदाचा कार्यभार सांभाळणारे हरिभाऊ फडोळ यांच्याकडून प्रशासन काढून घेत त्यांच्याकडे महिला व बालकल्याण विभाग, निवडणूक शाखा, अपंग कल्याण, कामगार कल्याण, माहिती अधिकारी आदी विभागांचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. फडोळ यांच्याकडील प्रशासनाचा कार्यभार मुख्य लेखा परीक्षक महेश बच्छाव यांच्याकडे अतिरिक्त म्हणून देण्यात आला आहे. फडोळ यांच्याकडील हॉकर्स झोनसंदर्भातील विभाग उपआयुक्त रोहिदास बहिरम यांच्याकडे सोपविण्यात आला असून बहिरम यांच्याकडील अतिक्रमण विभाग कायम ठेवण्यात आला आहे. उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांच्याकडील महिला बालकल्याण विभाग काढून घेत त्यांच्याकडे विविध करसह एलबीटीचा विभाग सोपविण्यात आला आहे. भुयारी गटार योजनेचे कार्यकारी अभियंता संजय घुगे यांच्याकडे दोरकुळकर यांच्याकडील गोदावरी संवर्धन कक्षाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला असून सहाय्यक आयुक्त आर. आर. गोसावी यांच्याकडे फडोळ यांच्याकडील समन्वयकाचा कार्यभार देण्यात आला आहे.
प्रशासकीय सोयीनुसार बदल्या
प्रशासकीय सोयीचा भाग म्हणून सदर बदल्या करण्यात आल्या आहेत. मुख्य लेखापरीक्षकाकडे प्रशासनाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. असा कार्यभार देण्याचा अधिकार आयुक्तांना आहे. त्यात चुकीचे काहीच नाही.
- तुकाराम मुंढे, आयुक्त, मनपा