नाशिक महापालिकेचे यंदाही मिशन विघ्नहर्ता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2021 05:46 PM2021-08-04T17:46:36+5:302021-08-04T17:48:28+5:30
नाशिक : कोरोनाचे संकट कमी झाल्याने गणेशोत्सव मंडळांनी उत्सव सुरू करण्याची तयारी केली असली तरी धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे यावेळी यंदाही महापालिकेच्या वतीने मिशन विघ्नहर्ता राबविण्यात येेणार आहे.
नाशिक: कोरोनाचे संकट कमी झाल्याने गणेशोत्सव मंडळांनी उत्सव सुरू करण्याची तयारी केली असली तरी धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे यावेळी यंदाही महापालिकेच्या वतीने मिशन विघ्नहर्ता राबविण्यात येेणार आहे.
नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी याबाबत माहिती दिली. गेल्या वर्षी कोरोनामुळे गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करता आला नसल्याने गणेशोत्सव मंडळे हिरमुसली होती. अर्थात, त्यावेळी कोरोनाची तीव्रता भयंकर असल्याने राज्य शासनाने निर्बंध घातले होतेच, शिवाय नाशिकच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानेदेखील अत्यंत साधेपणाने उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. यंदा मात्र, कोरोनाची दुसरी लाट ओसरली असल्याने आणि राज्य शासनाने निर्बंधही घटविल्याने आता मंडळांमध्ये उत्साह आहे. मात्र, शासकीय नियमावलीचे पालन करून यंदाही मिशन विघ्नहर्ता राबविण्यात येईल, असे आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले.
राज्य शासनाने गणेशोत्सवासंदर्भात नियमावली घालून दिली आहे त्यानुसार मंडप आणि मूर्तीची उंची निश्चित आहे. मात्र, त्याच बरोबर उत्सव साजरा करताना पर्यावरणस्नेही उत्सव साजरा करण्यावर महापालिका भर देणार आहेत. त्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. तसेच पर्यावरणपूरक सजावटी करण्यावर भर देण्यास सांगण्यात येणार आहे. नाशिक महापालिकेच्या वतीने गेल्या वर्षी विसर्जनच्या दिवशी गर्दी टाळण्यासाठी घरीच विर्सजन करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येेणार आहे. त्यामुळे मूर्ती विसर्जनासाठी अमोनियम बायकार्बोनेटचेदेखील वितरण करण्यात येणार आहे, असे आयुक्तांनी सांगितले.
महापालिकेने गेल्या वर्षी गर्दी टाळण्यासाठी नदीकाठी विसर्जनस्थळी जाणाऱ्या मिरवणुका तसेच गणेश भक्तांसाठी टाईम स्लॉट बुकिंगसाठी ॲप तयार करण्यात आले होते. तसेच ॲप यंदा वापरण्यात येणार आहे.