नाशिक महापालिकेतील मनसेच्या नगरसेविका सुरेखाताई भोसले यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 10:23 AM2017-12-19T10:23:20+5:302017-12-19T10:24:19+5:30
दुपारी अंत्यसंस्कार : चार वेळा भूषविले होते नगरसेवकपद
नाशिक - नाशिक महापालिकेतील प्रभाग क्रमांक १३ मधील महाराष्ट नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका सौ. सुरेखा रमेश भोसले यांचे कर्करोगाने निधन झाले. त्या ६३ वर्षांच्या होत्या. मनसेचे माजी आमदार नितीन भोसले यांच्या त्या काकू होत. त्यांच्या निधनामुळे रविवार कारंजा तसेच भद्रकाली परिसरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे.
सुरेखाताई भोसले यांच्या पश्चात पती, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. सुरेखाताई यांना फेबु्रवारी २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीतच त्रास सुरू झाला होता. तेव्हापासून त्या आजारीच होत्या. कर्करोगाशी सामना करत असतानाच मंगळवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. एक विनम्र, शालिन व्यक्तिमत्व आणि कार्यकर्ता म्हणून त्यांची शहरात ओळख होती. रुंग्टा हायस्कूल आणि बी.वाय.के. महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या सुरेखातार्इंचे आजोबा लक्ष्मणराव ठाकरे हे जुन्या पिढीतील सिनेनट होते तर त्यांचे वडिल रामदास ठाकरे हे एसटीचे पहिले कंट्रोलर होते. त्यांच्या आजी गोदूताई ठाकरे या नगरपालिका काळात उद्यान विभागाच्या सभापती होत्या तर त्यांचे दीर केशवराव भोसले हे नगरपालिका काळात नगरसेवक होते. घरात राजकीय वारसा लाभलेल्या सुरेखातार्इंनी १९९७ मध्ये पहिल्यांदा शिवसेनेकडून महापालिकेत प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर, झालेल्या चार निवडणुकांमध्ये त्यांना फक्त एकदा पराभव पत्करावा लागला होता. फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांनी चौथ्यांदा विजय संपादन करत महापालिकेत प्रवेश केला होता. मागील पंचवार्षिकमध्ये मनसेच्या सत्ताकाळात त्यांनी सभागृहनेतापद भूषविले होते. याशिवाय, आपल्या नगरसेवकपदाच्या कारकीर्दीत त्यांनी प्रभाग समिती सभापतीपद, स्थायी समिती, महिला बाल कल्याण समितीवरही सदस्य म्हणून काम पाहिले होते. त्यांच्या निधनामुळे मनसेला मोठा धक्का बसला आहे.