नाशिक महापालिकेच्या सहा शाळांमध्ये व्हर्च्यूअल क्लासरूमची संकल्पना साकारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 03:22 PM2017-11-30T15:22:02+5:302017-11-30T15:24:42+5:30
प्रकल्पाला खासदार निधी : नववर्षात संकल्पना राबविण्याची शिक्षण विभागाची तयारी
नाशिक : डिजिटल युगाशी जुळवून घेण्याची सवय आता महापालिका शाळांनाही लागली पाहिजे. त्यासाठीच, नाशिक महापालिकेच्या सहा शाळांमध्ये व्हर्च्यूअल क्लासरूमची संकल्पना राबविण्यात येणार असून, नववर्षात त्याचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी दिली आहे.
डिजिटल युगाचा स्वीकार करण्यात महापालिका शाळाही मागे राहू नयेत, यासाठी शिक्षण विभागामार्फत वेगवेगळ्या स्तरावर नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून व्हर्च्यूअल क्लासरूमची संकल्पना महापालिकेच्या शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या खासदार निधीतून मनपा शिक्षण विभागाला ६ व्हर्च्यूअल क्लासरूम मंजूर झाल्या आहेत. या क्लासरूमचे केंद्र मनपाच्या शाळा क्रमांक ६ मध्ये असणार आहे. शिक्षण विभागाने सहाही विभागातील एका शाळेची त्यासाठी निवड केली आहे. शाळा क्रमांक १६ मधून प्रक्षेपण संबंधित शाळांमध्ये केले जाणार आहे. त्यात प्रामुख्याने मान्यवर तज्ज्ञांची व्याख्याने, चर्चासत्र, शैक्षणिक लघुपट, अभ्यासाला पूरक फिल्मस् यांचा समावेश असणार आहे. संबंधित शाळांमध्ये आसपासच्या पालिका शाळांमधील विद्यार्थी निवडून त्यांचे गट करून त्यांना व्हर्च्यूअल क्लासरूमशी कनेक्ट केले जाणार आहेत. ज्या शाळांमध्ये नववी-दहावीचे विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठीही उपयुक्त अशा कार्यक्रमांची आखणी करण्याचे काम सुरू असल्याची माहिती उपासनी यांनी दिली. सर्व उपक्रमांचे रेकॉर्डिंग करून ठेवत त्यांचा उपयोग अन्य शाळांसाठी करण्याचा मनोदयही उपासनी यांनी व्यक्त केला. या क्लासरूमच्या माध्यमातून त्या-त्या शाळांमधील शिक्षकांचे उद्बोधन होणार आहे.
या शाळांमध्ये साकारणार व्हर्च्यूअल क्लासरूम
पंचवटी विभागातील म्हसरूळ येथील शाळा क्रमांक ८९, नाशिकरोड विभागात पंचक येथील शाळा क्रमांक ३६, नाशिक पूर्व विभागात टाकळी येथील शाळा क्रमांक ४७, गंगापूररोडवरील आनंदवली येथील शाळा क्रमांक ७१, सातपूर विभागात विश्वासनगर येथील शाळा क्रमांक २२ आणि सिडको विभागात अंबड येथील शाळा क्रमांक ७२ याठिकाणी व्हर्च्यूअल क्लासरूम साकारण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक ती सामग्री उपलब्ध करून देण्यात येणार आहे.