उत्पन्न वाढीसाठी नाशिक मनपाचा ‘खटाटोप’ स्वच्छता कर, मोबाईल टॉवरला देणार जागा
By श्याम बागुल | Published: August 22, 2023 04:07 PM2023-08-22T16:07:43+5:302023-08-22T16:10:31+5:30
महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी सोमवारी (दि.२१) सर्व खातेप्रमुखांची आढावा बैठक घेतली.
नाशिक : केंद्र सरकारच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या सूचनेनुसार नाशिक महापालिकेने घरपट्टी, पाणीपट्टी व अन्य विविध कराद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा आणखी कोणत्या मार्गाने मनपाचे उत्पन्न वाढविता येऊ शकते याचा शोध घेण्यास सुरुवात केली असून, त्यासाठी शहरातील नागरिकांना स्वच्छता कर लागू करण्याबरोबरच मनपाच्या मोकळ्या मिळकतींवर मोबाईल टॉवर उभारण्यास जागा देणे, वाहनतळांचा विकास करून त्या माध्यमातून शुल्क आकारणी करण्याचे मार्ग अवलंबिण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.
यासह अन्य आणखी काही पर्याय आहेत काय याचा अभ्यास करण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी सोमवारी (दि.२१) सर्व खातेप्रमुखांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत आयुक्तांनी महापालिकेच्या अंदाजपत्रकाचा आढावा घेताना सर्व विभागांनी त्यांच्या विभागाशी संबंधित सर्व कामांच्या निविदा प्रक्रियेची सद्यस्थिती दर्शविणारी माहिती व सुरू करावयाच्या कामांची सविस्तर माहिती दोन दिवसात सादर करण्याचे आदेश दिले.