नाशिक मनपाला कर सवलत पावली; ५० टक्के घरपट्टी वसुली
By श्याम बागुल | Published: July 3, 2023 04:46 PM2023-07-03T16:46:17+5:302023-07-03T16:47:49+5:30
तीन महिन्यांत उच्चांक
श्याम बागुल, नाशिक : महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी दरवर्षीच देण्यात येणाऱ्या एप्रिल ते जून या तीन महिन्यांतील कर सवलतीत यंदा दोन टक्क्यांनी वाढ केल्याने त्याचा चांगलाच फायदा मनपाला झाला असून, गेल्या तीन महिन्यांत जवळपास ५० टक्के म्हणजे ९० कोटी ७७ लाख रुपयांची वसुली झाली आहे.
या घरपट्टीत तब्बल २ लाख १६ हजार २४० मिळकतधारकांनी या सवलत योजनेचा लाभ घेत ३.६३ कोटी रुपयांची सवलतही घेतली आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात महापालिकेने १८८ कोटी रुपयांची विक्रमी घरपट्टी वसूल केली होती. त्यामुळे २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता घरपट्टीसाठी २१० कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यात दरवर्षी एप्रिल ते जून या कालावधीमध्ये आगाऊ कर भरणाऱ्यांना करसवलत योजना जाहीर केली जाते. यंदा मात्र वसुली वाढविण्यासाठी त्यात दोन टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. त्यामुळे एप्रिलपासूनच घरपट्टी भरण्यासाठी मिळकतधारकांनी चांगला प्रतिसाद दिला. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात एप्रिल महिन्यातच तब्बल ५१ कोटी ८० लाख, दुसऱ्या टप्प्यात मे महिन्यात १४.०४ कोटी तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात जूनमध्ये २५.३९ कोटीं असा एकूण ९०.७७ कोटींचा महसूल मिळाला आहे.