नाशिक महापालिकेत नगसेवकांसह सामान्य नागरिकांना शस्त्रधारी सुरक्षारक्षकांचा जाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 11:21 PM2017-11-24T23:21:35+5:302017-11-25T00:30:57+5:30
महापालिकेत नियुक्त करण्यात आलेल्या महाराष्टÑ सुरक्षा मंडळाच्या शस्त्रधारी सुरक्षारक्षकांचा जाच नगसेवकांसह सामान्य नागरिकांनाही वाढू लागल्याने त्याचे तीव्र पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. महापालिकेत कर्फ्यू लागला की काय, अशी स्थिती निर्माण झाल्याचा आरोप करत सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी सभापतींनी केवळ आयुक्तांच्याच दालनापुढे शस्त्रधारी सुरक्षारक्षक नेमावेत, असे आदेशित केले.
नाशिक : महापालिकेत नियुक्त करण्यात आलेल्या महाराष्टÑ सुरक्षा मंडळाच्या शस्त्रधारी सुरक्षारक्षकांचा जाच नगसेवकांसह सामान्य नागरिकांनाही वाढू लागल्याने त्याचे तीव्र पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. महापालिकेत कर्फ्यू लागला की काय, अशी स्थिती निर्माण झाल्याचा आरोप करत सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी सभापतींनी केवळ आयुक्तांच्याच दालनापुढे शस्त्रधारी सुरक्षारक्षक नेमावेत, असे आदेशित केले. महापालिका मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवन परिसरात प्रशासनाने महाराष्टÑ सुरक्षा मंडळाचे शस्त्रधारी सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांत नगरसेवकांची अंगझडती घेण्यापासून ते आपल्या प्रश्नांसाठी दाद मागण्याकरिता येणाºया सामान्य नागरिकांची अडवणूक केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. शुक्रवारी (दि. २४) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत त्याचे पडसाद उमटले. म्युनिसिपल कामगार सेनेचे अध्यक्ष व स्थायीचे सदस्य प्रवीण तिदमे यांनी सदर शस्त्रधारी सुरक्षारक्षकांच्या नेमणुकीस पुन्हा एकदा ठामपणे विरोध दर्शविला. स्थायी समितीने मुख्यालयात केवळ आयुक्तांच्या दालनापुढे दोन शस्त्रधारी सुरक्षारक्षक नियुक्तीचे आदेशित केले असताना २८ सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. सदर सुरक्षारक्षकांना तातडीने हटविण्याची मागणी तिदमे यांनी केली. सूर्यकांत लवटे यांनी महापालिकेला पोलिसी छावणीचे स्वरूप आल्याचे सांगत पोलीस दलात रिजेक्ट झालेल्या या सुरक्षारक्षकांच्या प्रशिक्षणाबद्दलही शंका उपस्थित केली. डी. जी. सूर्यवंशी यांनी महापालिकेत कर्फ्यू लागल्याची स्थिती निर्माण झाल्याचे सांगत स्थायीने केलेल्या ठरावाची अंमलबजावणी न झाल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले, महापालिकेत सहा गनधारी व ११ सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली असून, उर्वरित सुरक्षारक्षकांची नियुक्ती जलशुद्धीकरण केंद्रांवर करण्यात आल्याचे सांगितले. अतिरेकी कारवारांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. परंतु महापालिका हे सार्वजनिक ठिकाण असून, याठिकाणी रोज शेकडो नागरिक आपल्या समस्या घेऊन येत असतात. यापूर्वी महापालिकेला अशा सुरक्षारक्षकांची कधीही गरज भासली नाही; मग आताच एवढी भीती का वाटते आहे, असा सवालही सदस्यांनी उपस्थित केला. सदर सुरक्षारक्षक तातडीने महापालिका मुख्यालयातून हलवावे, अशी मागणीही सदस्यांनी केली.
स्थायीच्या ठरावाची अंमलबजावणी करा
स्थायी समितीने सदर ठराव मंजूर करताना केवळ आयुक्तांच्याच दालनापुढे सुरक्षारक्षक तैनात असतील असे स्पष्ट केले होते; परंतु ठरावाची अंमलबजावणी न होता भलताच उद्योग सुरू असल्याचा आरोप प्रवीण तिदमे यांनी केला. त्यावर सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी स्थायी समितीने केलेल्या ठरावानुसारच अंमलबजावणी करण्याचे आदेशित केले.