सिंहस्थासाठी नाशिक महापाालिका मोडणार २०० कोटींच्या ठेवी
By Suyog.joshi | Updated: February 16, 2025 14:52 IST2025-02-16T14:52:09+5:302025-02-16T14:52:30+5:30
महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी नाशिक महापालिकेचे अंदाजपत्रक सादर केले.

सिंहस्थासाठी नाशिक महापाालिका मोडणार २०० कोटींच्या ठेवी
- सुयोग जोशी
नाशिक : महापालिकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ६६.३० कोटी आरंभीच्या शिलकीसह ३०५४.७० कोटी रूपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला रविवारी (दि.१६) सादर केले. गेल्या वर्षीच्या तुलनेत ५०० कोटी रूपयांची वाढ करण्यात आली आहे. दोन वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा होत असून पायाभूत सुविधा उभारण्यासाठी कर्ज उचलण्याऐवजी महापालिकेने दोनशे कोटींच्या ठेवी मोडण्याचा निर्णय घेतला आहे. कर्ज उचलल्यास व्याजापोटी दरवर्षी मोठी रक्कम अदा करावी लागेल. त्यामुळे कर्जाऐवजी ठेवी मोडल्या जातील. दरम्यान २०२५ - २६ अर्थसंकल्पात सिंहस्थ आराखडा व्यतिरिक्त कामांसाठी पाच कोटी रुपये टोकनची तरतूद करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी नाशिक महापालिकेचे अंदाजपत्रक सादर केले. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी दत्तात्रय पाथरूट, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल, प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर उपस्थित होते. कुंभमेळ्यासाठी शासन आराखड्यात मंजूर नसलेली कामे परंतु सिंहस्थाच्यादृष्टिने आवश्यक व पूरक असणाऱ्या कामासाठी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी विविध विभागांची विकास कामांसाठी १२५ कोटींच्या प्राकलनसाठी टोकन म्हणून पाच कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. सिंहस्थासाठीच पाणीयोजना करण्यासाठी ३२८.९० कोटींची तरतूद करण्यात आली.
शहराची वाढती लोकसंख्येचा विचार करता सद्यस्थितीतील गंगापूर धरण येथून असलेली मुख्य रॉ वॉटर पाईप लाइन पीएससी असून तिची क्षमता कमी होत आहे. पाणी गळती वाढत असल्याने नवीन पाईप लईन टाकण्याची गरज आहे. त्यामुळे पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाचे अनुदानातून गंगापूर धरण ते बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत १८०० मीमी व्यासाची लोखंडी साहित्याची मुख्य गुरूत्ववाहिनी टाकण्याचा २१० कोटी रकमेचा प्रकल्प तयार करण्यात आला आहे.