नाशिक मनपाच्या सिटीलींक बसला पुन्हा ब्रेक; 3 महिन्याचा पगार रखडला, चालकांचे काम बंद
By संजय पाठक | Published: February 29, 2024 11:43 AM2024-02-29T11:43:12+5:302024-02-29T11:43:46+5:30
मनपा प्रशासनाने सुरू केलेल्या सिटीलिंक बसच्या चालक व वाहकांचे राजकीय वरदहस्त असलेल्या ठेकेदाराने पुन्हा मागील तीन ते चार महिन्यांचे वेतन थकविल्याने चालक व वाहकांनी एल्गार पुकारत संप पुकरल्याने आज पहाटेपासूनच बस वाहतूक ठप्प झाली.
संदीप झिरवाळ, नाशिक: मनपा प्रशासनाने सुरू केलेल्या सिटीलिंक बसच्या चालक व वाहकांचे राजकीय वरदहस्त असलेल्या ठेकेदाराने पुन्हा मागील तीन ते चार महिन्यांचे वेतन थकविल्याने चालक व वाहकांनी एल्गार पुकारत संप पुकरल्याने आज पहाटेपासूनच बस वाहतूक ठप्प झाली. सिटीलींक बस सेवा बंद पडल्याने त्याचा परिणाम शालेय विद्यार्थी तसेच कामगार वर्गावर झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. सिटीलिंक बसच्या ठेकेदाराकडून यापूर्वी देखील चालक वाहकांचे वेतन रोखले गेल्याने चालक आणि वाहकांनी संप पुकारला होता विशेष म्हणजे आत्ता पर्यंत जवळपास वेतन रखडविल्याच्या कारणावरून पुकारलेला सातवा बंद असल्याचे चालक आणि वाहकांनी सांगितले.
सिटीलिंकच्या बस वाहक व चालकांनी दोन दिवसांपूर्वीच रखडलेले वेतन वेळेत द्यावे अशी मागणी सिटीलींक प्रशासन व ठेकेदाराकडे केली होती मात्र राजकीय वरद हस्त असलेल्या त्या संबंधित ठेकेदाराने पुन्हा पहिले पाढे गिरवत वाहक आणि चालकांचे वेतन रखडविल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलनात्मक पवित्रा घेत सिटीलींक बस सेवा बंद पाडली. गुरुवारी पहाटेपासूनच बस फेऱ्या बंद असल्याने नाशिक शहरातील रस्त्यावर एकही सिटी लिंक धावलेली नव्हती. सिटी लिंक बस सेवा बंद असल्याने दैनंदिन सकाळी शाळेत तसेच कामावर शेकडो जाणाऱ्या कामगारांची गैरसोय झाली होती त्यामुळे अनेकांना इच्छितस्थळी जाण्यासाठी दुचाकी तसेच रिक्षाने प्रवास करावा लागल्याचे चित्र दिसून आले.
बस चालक व वाहकांच्या वेतनासह अनेक मागण्या रखडलेल्या असून त्या मागण्या सिटीलिंक प्रशासन आणि संबंधित ठेकेदार वेळेत पूर्ण करत नसल्याने सिटीलिंकच्या चालक आणि वाचकांवर वारंवार संप करण्याची वेळ येत आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना हकनाक त्रास सहन करावा लागत आहे. गुरुवारी सकाळी चालक व वाहकांनी तपोवन बस डेपोत ठिय्या मांडला होता.