नाशिकमध्ये मनपा अधिकाऱ्यांच्या गळ्यात कच-याचे हार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 07:26 PM2020-02-14T19:26:43+5:302020-02-14T19:29:04+5:30
नाशिक- सिडको प्रभागात गेल्या पंधरा दिवसांपासून घंटागाडी येत नसल्याने कचºयाचे ढीग साचले असून, नागरिक त्यांच्या घरातील कचरा हा नगरसेवकांच्या घरात आणून टाकत असल्याने संतप्त झालेल्या नगरसेवकांनी प्रभाग समितीच्या बैठकीत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. सुनील बुकाणे आणि विभागीय अधिकारी डॉ. सोमनाथ वाडेकर यांना कच-याचा हार घालत संताप व्यक्त केला
नाशिक- सिडको प्रभागात गेल्या पंधरा दिवसांपासून घंटागाडी येत नसल्याने कचºयाचे ढीग साचले असून, नागरिक त्यांच्या घरातील कचरा हा नगरसेवकांच्या घरात आणून टाकत असल्याने संतप्त झालेल्या नगरसेवकांनी प्रभाग समितीच्या बैठकीत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. सुनील बुकाणे आणि विभागीय अधिकारी डॉ. सोमनाथ वाडेकर यांना कच-याचा हार घालत संताप व्यक्त केला. त्याचप्रमाणे सभागृहात कचराफेक आंदोलन करून अक्षरश: कचराकुंडी केली. येत्या सोमवारपर्यंत सिडकोतील घंटगाडीचा प्रश्न मार्गी न लागल्यास मनपा आयुक्तांच्या दालनात ‘कचरा फेक’ आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी नगरसेवकांनी दिला.
सिडको आणि सातपूर विभागांसाठी यापूर्वी जीटी पेस्ट कंट्रोल कंपनीचा ठेका होता. परंतु अनियमितता आणि कराराचा भंग होत असल्याचा ठपका ठेवून २४ डिसेंबर रोजी आयुक्तांनी हा ठेका रद्द केला आहे. त्यानंतर अन्य ठेकेदाराला कचरा संकलन करण्यास सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र जागोजागी कच-याचे ढीग असून, पर्यायी व्यवस्था झालेली नाही. त्यामुळे नगरसेवक संतप्त झाले आहेत. शुक्रवारी (दि.१४) प्रभाग समितीच्या बैठकीत त्याचे पडसाद उमटले.
सभापती दीपक दातीर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.१४) प्रभाग समितीची सभा झाली. शिवसेना नगरसेवक सुधाकर बडगुजर व हर्षा बडगुजर यांनी प्रभागात गेल्या पंधरा दिवसांपासून घंटागाडी येत नसल्याने मनपाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त करीत चक्क प्रभागातील कचराच सभागृहाच्या दालनात आणून ‘कचरा फेक’ आंदोलन केले. संपूर्ण सिडकोत घंटागाडीचा बोजवारा उडालेला असल्याने या प्रश्नाबाबत सर्वपक्षीय नगरसेवक आक्रमक झाले. घंटागाडी प्रश्नाबाबत अधिकारी लक्ष देत नसल्याने प्रभाग सभेत नगरसेवकांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. सुनील बुकाणे व विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांनी चक्क कच-यातील हार घालून निषेध व्यक्त केला.
येत्या सोमवारपर्यंत याबाबतचा निर्णय न झाल्यास मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या कार्यालयात पुन्हा ‘कचरा फेक’ आंदोलन करण्याचा इशारा यावेळी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी दिला.