Nashik: अहो आश्चर्यम, आता विहिरीतील पाण्याचीही चोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 05:13 PM2023-08-22T17:13:57+5:302023-08-22T17:14:39+5:30
Nashik: येवला तालुक्यातील कातरणी येथील नामदेव कारभारी कदम यांच्या विहिरीतील पंधरा फूट पाणी अज्ञात चोरट्यांनी उपसून नेल्याने शेतकऱ्याला पिण्याच्या व जनावरांच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
- भाऊराव वाळके
जळगाव नेऊर, ता. येवला (जि. नाशिक) : आतापर्यंत आपण घरातील चोरी, दुकानातली चोरी, बँकेतील चोरी किंवा शेतातील शेतमालाची चोरी बघितली आहे; पण येवला तालुक्यातील कातरणी येथील नामदेव कारभारी कदम यांच्या विहिरीतील पंधरा फूट पाणी अज्ञात चोरट्यांनी उपसून नेल्याने शेतकऱ्याला पिण्याच्या व जनावरांच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
कातरणी येथील शेतकरी नामदेव कारभारी कदम यांनी तळेगाव शिवारात असलेल्या शेतकऱ्याकडून विकत पाणी घेऊन पंधरा फूट पाणी घरापासून एक किलोमीटर दूर असलेल्या विहिरीत पिण्यासाठी व जनावरांसाठी साठवले होते; पण अज्ञातांनी मध्यरात्री पाणी चोरून नेल्याने शेतकऱ्यावर ऐन दुष्काळात पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. सध्या येवला तालुक्यात खरीप हंगामातील पिके होरपळून गेली असून विहिरीत, शेततळ्यात साठवलेल्या पाण्यावर शेतकरी स्वतःची तहान भागवून जनावरांची तहान भागवत आहे आणि उरलेल्या पाण्यावर कांद्याची रोपे स्प्रिंकलरच्या साहाय्याने जगवत आहे. जनावरांसाठी व पिण्यासाठी ठेवलेले पाणी शेतकरी नामदेव कदम हे सकाळी जनावरांना पाणी काढण्यासाठी विहिरीवरती गेले असता, त्यांना फक्त विहिरीत अर्धाच फूट पाणी शिल्लक दिसले. गेल्या दोन महिन्यांपूर्वी या शेतकऱ्याच्या वस्तीवर भर दुपारी दोन ते तीन लाख रुपये किमतीचे दागिने व घरातील इतर वस्तू चोरीला गेल्या होत्या. अजून त्याचाही तपास लागलेला नसून ही घटना घडली. गेल्या १५ दिवसांपूर्वी गोकूळ भास्कर जाधव यांच्या शेततळ्यात असलेली ३ फेज मोटर चोरीला गेली होती. या चोरीचे सत्र सुरू असताना चोरट्यांनी विहिरीतील पाण्यावर डल्ला मारल्याने परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.
आमचा परिसर हा पूर्णतः निसर्गावर अवलंबून असून, पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. साठवलेल्या पाण्यावर पिण्याचा पाण्याचा, जनावरांचा प्रश्न मिटवावा लागतो; पण ऐन दुष्काळात अज्ञात चोरट्यांनी विहिरीतील पंधरा फूट पाणी उपसून नेल्याने पिण्याच्या पाण्यासह जनावरांची पंचायत झाली आहे.
- नामदेव कदम, कातरणी शेतकरी