नाशिकमध्ये आता औषधेही मिळू लागली घरपोच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 03:24 PM2020-04-12T15:24:22+5:302020-04-12T15:26:49+5:30
नाशिक : औषधे हवी आहेत, मग घराबाहेर पडण्याची आता गरज नाही, जिल्हा प्रशासनाने थेट हवी ती औषधे घरपोच देण्यासाठी नवीन सेवा उपलब्ध करून देत त्यासाठी एक स्वतंत्र व्हाट्स अॅप क्रमांक (९७००००९७५३) जारी केला आहे. त्याचा अनेक जणांनी लाभ घेण्यास प्रारंभ केला आहे.
नाशिक : औषधे हवी आहेत, मग घराबाहेर पडण्याची आता गरज नाही, जिल्हा प्रशासनाने थेट हवी ती औषधे घरपोच देण्यासाठी नवीन सेवा उपलब्ध करून देत त्यासाठी एक स्वतंत्र व्हाट्स अॅप क्रमांक (९७००००९७५३) जारी केला आहे. त्याचा अनेक जणांनी लाभ घेण्यास प्रारंभ केला आहे.
लॉकडाउन आणि संचारबंदी काळातसुद्धा औषधे खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात विविध उपनगरात घराबाहेर पडत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आले. यामुळे लॉकडाउनचा प्रयोग संपूर्णपणे यशस्वी होऊ शकणार नाही, त्यामुळे प्रशासनाने पुढाकार घेत घरपोच औषधे उपलब्ध करून देण्याची सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. यासाठी एक व्हाट्सअॅप क्रमांक प्रसारित करण्यात आला असून, त्यावर संपर्क साधल्यास संबंधित रुग्णाला घरपोच औषधे दिली देण्यात येत आहेत.
कोरोना संसर्गाचा प्रसार होऊ नये याकरिता नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन सरकार आणि जिल्हा प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे. तरीही औषधे, भाजीपाला व तत्सम जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांना घराबाहेर पडावे लागते आहे. अर्थात एरवीपेक्षा घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांचे प्रमाण खूपच अत्यल्प आहे. नागरिकांना घरपोच फळे आणि भाजीपाला मिळावा याकरिता जिल्हा प्रशासनाने एका खासगी पुरवठादार कंपनीच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नागरिक या सुविधेचा लाभ घेत आहेत.
औषधांची दुकाने सुरू असली तरी रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाइकांना या दुकानांपर्यंत सहजतेने पोहोचता येईलच असे नाही. प्रवासी वाहतुकीची साधनेही बंद असून, अनेकांकडे शहरातील औषध दुकानांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणतेही साधन नाही. अशा सर्वच घटकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. दाऊदी बोहरा जमातच्या मार्गदर्शनाखाली सैफी अॅम्बुलन्स कॉर्पोरेशनने घरपोच औषधे पुरविण्याची तयारी दर्शविली.
या उपक्रमाला जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून पाठबळ दिले आहे. 'घरातच रहा सुरक्षित रहा' असा संदेशही प्रशासनाने दिला आहे. कोणत्याही आजारावरील औषधे शहरातील रुग्णांना घरपोच मिळणार आहेत. याकरिता व्हाट्सअॅप क्रमांक देण्यात आला आहे. या क्रमांकावर रुग्णाचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक आणि औषधांची प्रिस्क्रिप्शन पाठविल्यास दुसºया दिवशी ही औषधे संबंधित रुग्णाच्या घरी पोहोच केली जातात. या औषधांची मागणी किमान एक दिवस अगोदर करणे अपेक्षित आहे. ही सुविधा केवळ शहरातील रुग्णांसाठीच उपलब्ध आहे. औषधे स्वीकारल्यानंतर त्याचे बिल अदा करावे लागते.