Nashik: वृद्धाने जीवन संपविण्यासाठी गोदावरीत घेतली उडी; जीवरक्षकांच्या सतर्कतेमुळे मिळाले जीवदान
By अझहर शेख | Published: September 19, 2022 11:08 AM2022-09-19T11:08:37+5:302022-09-19T11:09:18+5:30
Nashik: कुटुंबातील सदस्यांनकडून मानसिक त्रास दिला जात असल्याने कंटाळलेल्या वृद्धाने नैराश्यातून सोमवारी (दि.19) सकाळी नऊ वाजता गोदावरीत उडी घेतली. सुदैवाने ही बाब येथील जीवरक्षकांच्या लक्षात आल्याने त्यांनी त्वरित नदीत सूर फेकून वृद्धाला सुरक्षित बाहेर काढले.
- अझहर शेख
नाशिक : कुटुंबातील सदस्यांनकडून मानसिक त्रास दिला जात असल्याने कंटाळलेल्या वृद्धाने नैराश्यातून सोमवारी (दि.19) सकाळी नऊ वाजता गोदावरीत उडी घेतली. सुदैवाने ही बाब येथील जीवरक्षकांच्या लक्षात आल्याने त्यांनी त्वरित नदीत सूर फेकून वृद्धाला सुरक्षित बाहेर काढले.
सिडकोच्या लेखानगर येथील रहिवासी असलेले गोपीनाथ कोंडाजी त्रिभुवन (६५) यांनी दुतोंडया मारुतीच्या मूर्तिजवळ उडी मारली. ते पाण्यात गटांगळ्या खाऊ लागताच जीवरक्षक दिलीप कुरणे यांच्या ही बाब लक्षात आली. कुरणे यांनी क्षणाचाही विलंब न लावता पाण्यात उडी घेतली. पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या वृद्धाला त्यांनी गाठून सुरक्षितरित्या नदीपात्रातुन रामसेतु जवळून बाहेर काढले. त्रिभुवन मिळेल तसे मजुरीची कामे करतात. सिडको भागात ते कुटुंबासह वास्तव्यास आहेत. ते मूळचे वैजापूरचे असून कुटुंबातील लोक त्रास देतात. वारंवार टोमणे मारतात मानसिक छळ करतात, यामुळे आपण आपल्याला संपवून घेऊ, या विचाराने गोदावरीत उडी मारली होती, असे त्रिभुवन यांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे गस्तीपथक तसेच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणातून रात्री 8 हजार क्यूसेक विसर्ग गोदावरीत करण्यात आला आहे. यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. नदीकाठी प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. अशातच त्रिभुवन यांनी नदीत घेतलेल्या उडीमुळे ते मोठया पाण्याच्या प्रवाहात सापडले होते. सुदैवाने जीवरक्षकाच्या वेळीच लक्षात आल्याने त्यांना जीवनदान मिळाले.