Nashik: ऐन दिवाळीत नाशिक मनपा कर्मचारी संपावर, म्युनिसिपल कामगार सेनेचा इशारा
By Suyog.joshi | Published: October 5, 2023 11:00 AM2023-10-05T11:00:55+5:302023-10-05T11:01:14+5:30
Nashik News: चौदा दिवसांच्या कालावधीत मागण्यांबाबत निर्णय न झाल्यास संप पुकारला जाणार येणार आहे, अशी माहिती अध्यक्ष सुधाकर बडगुजर, सरचिटणीस सोमनाथ कासार यांनी दिली.
- सुयोग जोशी
नाशिक - सातवा वेतन आयोग फरक अदा करणे, आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देणे, पदोन्नती, सहावा वेतन आयोग जोड पत्र तीन नुसार किमान वेतन विचारात घेऊन वेतननिश्चिती करणे यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्यांकडे महानगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेकडून संपाची नोटीस बजावली असून, चौदा दिवसांच्या कालावधीत मागण्यांबाबत निर्णय न झाल्यास संप पुकारला जाणार येणार आहे, अशी माहिती अध्यक्ष सुधाकर बडगुजर, सरचिटणीस सोमनाथ कासार यांनी दिली.
शासकीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम अदा करणे आवश्यक आहे तसेच शासनाप्रमाणेच मनपा कर्मचाऱ्यांना देखील चार हप्ते अदा करावे. सातवा वेतन आयोग फरकाचा तिसरा व चौथा हप्ता अद्याप अदा केलेला नाही, तो तातडीने अदा करावा, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे मनपा कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा जशाचा तसा लाभ देण्याबाबत सक्षम प्राधिकरणाची मान्यता आहे. अनुकंपा तत्वावर नियुक्त केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना नियुक्तीच्या दिनांकापासून नियमित वेतन श्रेणी लागू करावी. लेखा व लेखापरीक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना २०१३ तदर्थ पदोन्नती दिलेली होती. त्यांना पदस्थापना द्यावी. आस्थापनेवरील फिरतीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पदनिहाय वाहनभत्ता अदा करण्यासाठी आदेश पारित करण्यात आले होते. चौदा वर्षांनंतरही वाहन भत्त्यात वाढ केलेली नाही आदी मागण्या नोटिशीत करण्यात आल्या आहेत.
सफाई कामगारांच्या इमारतीची दुरवस्था
हजेरी शेडवर स्वच्छतागृह, बाथरुम, पिण्याचे पाणी, लाइट व इतर प्राथमिक स्वरूपाच्या सोयी उपलब्ध नाहीत. तसेच हजेरी नोंदणी वेळी बराच कालावधीसाठी थांबावे लागते. तेथे तात्पुरती आसन व्यवस्था करावी. मनपा मालकीच्या निवासस्थानात सफाई कामगार वर्षानुवर्षे वास्तव्य करत आहेत या इमारतीच्या दुरवस्थेची समक्ष पाहणी करावी. व दुरुस्ती करण्यासाठी बांधकाम विभागास सूचित करावे. मनपा कर्मचाऱ्यांना त्यांचे मूळ वेतन व इतर अनुज्ञेय भत्ते यानुसार अति कालीन भत्ता देण्याची मागणी संघटनेचे अध्यक्ष बडगुजर व सरचिटणीस कासार यांनी केली आहे.
महापालिकेत मोठ्या प्रमाणावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना डावलून कनिष्ठ आणि वरिष्ठ यांच्यात वाद निर्माण करून आर्थिक आमिषाने बदली केली जात आहे. कोणावर अन्याय होणार नाही याचा दक्षता प्रशासनाने घेतली पाहिजे. यात आयुक्तांनी लक्ष घालावे. बाहेरून महापालिकेला कोणी ऑपरेट करते काही शंका आहे.
-सुधाकर बडगुजर
(अध्यक्ष, म्युनिसिपल कामगार सेना, मनपा)