साहित्य संमेलनासाठी नाशिक हाच पर्याय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:44 AM2021-01-08T04:44:58+5:302021-01-08T04:44:58+5:30

नाशिक : साहित्य संमेलनाच्या स्थळपाहणीसाठी आलेल्या अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीने गुरुवारी सकाळीच प्रस्तावित साहित्य संमेलनासाठीच्या जागेची ...

Nashik is the only option for Sahitya Sammelan! | साहित्य संमेलनासाठी नाशिक हाच पर्याय !

साहित्य संमेलनासाठी नाशिक हाच पर्याय !

Next

नाशिक : साहित्य संमेलनाच्या स्थळपाहणीसाठी आलेल्या अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीने गुरुवारी सकाळीच प्रस्तावित साहित्य संमेलनासाठीच्या जागेची पाहणी करीत समाधान व्यक्त केले. तसेच दिल्लीने जरी प्रस्ताव दिलेला असला तरी त्या पर्यायाचा महामंडळाने विचारच केलेला नसल्याने तिथे स्थळपाहणीसाठी समितीदेखील गेली नसल्याचे सांगून महामंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. दादा गोरे यांनी नाशिक हाच संमेलनासाठीचा पर्याय असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले.

दिल्लीसारख्या शहरात कोरोनाचे प्रमाण अद्यापही प्रचंड असल्याने दिल्लीचा विचारच झालेला नसल्याचे गोरे यांनी स्थळपाहणीनंतर पत्रकारांना सांगितले. दिल्ली हा माध्यमांनीच निर्माण केलेला पर्याय आहे. महामंडळाने दिल्लीच्या नावाचा जर खरोखर विचार केला असता, तर दिल्लीत जाऊन स्थळ निवड समितीने पाहणी केली असती, असेही गोरे यांनी नमूद केले. समितीने सकाळपासून गोखले एज्युकेशन सोसायटीमधील संपूर्ण परिसर तसेच येथील सभागृह आणि मुख्य मैदानासह स्टॉल उभारणीसाठीच्या जागेची पाहणीदेखील केली. स्थळपाहणीनंतर केवळ मी समाधानी असणे पुरेसे नसून सर्व समिती सदस्यांनादेखील हे समाधानकारक वाटले असल्यास तसा अहवाल शुक्रवारी अध्यक्षांसमोरील बैठकीत ठेवण्यात येणार असल्याचे गोरे यांनी नमूद केले. पाहणीसाठी केलेल्या स्थळ निवड समितीमध्ये कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे, प्रा. प्रतिभा सराफ, प्रदीप दाते, प्रकाश पायगुडे यांचा समावेश होता. मात्र, महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील आरोग्याच्या समस्येमुळे स्थळ निवड समितीच्या अन्य सदस्यांसमवेत येऊ शकलेले नव्हते. निमंत्रक लोकहितवादी मंडळाच्या वतीने अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी नाशिककरांच्या वतीने लोकहितवादीने महामंडळाला निमंत्रण दिले असून, नाशिकला संमेलन मिळाल्यास सर्व नाशिककरांच्या सहकार्याने ते यशस्वी करुन दाखवू, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. यावेळी लोकहितवादी मंडळाचे मुकुंद कुलकर्णी, किरण समेळ, सुभाष पाटील, शंकर बोराडे, संजय करंजकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

इन्फो

शुक्रवारी स्थळाबाबत होणार अंतिम घोषणा

स्थळ निवड समिती त्यांचा अहवाल शुक्रवारी अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्यासमोर ठेवणार आहे. त्यानंतर शुक्रवारीच पुन्हा त्यानंतरच्या बैठकीनंतर औरंगाबादला पत्रकार परिषद घेऊन स्थळ निश्चितीबाबतची अंतिम घोषणा करण्यात येणार आहे.

Web Title: Nashik is the only option for Sahitya Sammelan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.