Nashik Oxygen Leak: डॉ. झाकीर हुसेन दुर्घटनेप्रकरणी नाशिक महापालिकेचीही चौकशी समिती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 01:49 PM2021-04-22T13:49:28+5:302021-04-22T13:51:27+5:30
Nashik Oxygen Leak: काल दुपारी ऑक्सिजनचा पुरवठा करताना व्हॉल्व बिघडल्याने ऑक्सिजनची गळती झाली. त्याच वेळेस रूग्णांना मिळणारा ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाल्याने चोवीस रुग्ण दगावले.
नाशिक : महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात काल ऑक्सिजन गळती होऊन रुग्णांना प्राणवायू न मिळाल्याने 24 रुग्णांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची शासन स्तरावर उच्चस्तरीय चौकशी होत असली तरी सुद्धा नाशिक महापालिकेच्यावतीनेही चौकशी करण्याचा निर्णय आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. सभापती गणेश गीते यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी या समितीची बैठक संपन्न झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला.
महापालिकेने डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन टाकी बसवली असून ती 31 मार्च रोजी कार्यान्वित करण्यात आली. ही टाकी भाड्याने घेण्यात आली असून टाकीची देखभाल दुरुस्ती दहा वर्षाकरिता पुरवठा ठेकेदाराकडून करून घेण्यात येत आहे. त्याठिकाणी नाशिक महापालिकेचे देखील दोन अभियंते नियुक्त करण्यात आले आहेत, अशा सर्व स्थितीत देखील काल दुपारी ऑक्सिजनचा पुरवठा करताना व्हॉल्व बिघडल्याने ऑक्सिजनची गळती झाली. त्याच वेळेस रूग्णांना मिळणारा ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाल्याने चोवीस रुग्ण दगावले.
(Nashik Oxygen Leak: प्राण तळमळला...; नाशकात घडलेली दुर्घटना मन सुन्न करणारी)
ही घटना अत्यंत गंभीर असल्याने महापालिकेच्या स्तरावरील निविदा प्रक्रिया बाबत या बैठकीत जोरदार चर्चा करण्यात आली. तसेच अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण अष्टेकर यांच्यावर देखील या प्रकरणी ठपका ठेवण्यात आला. राज्य शासनाच्यावतीने या संदर्भात स्वतंत्र चौकशी समिती असली तरी महापालिकेच्या स्तरावर नगरसेवक आणि या प्रकरणाशी संबंधित नसलेल्या अधिकाऱ्यांची एक समिती गठित करण्यात यावी, तसेच ठेकेदार कंपनीवर कारवाई करावी, असे आदेश सभापती गणेश गीते यांनी या बैठकीत दिले.