Nashik Oxygen Leak: नाशिकमध्ये हाहाकार! ऑक्सिजन गळतीमुळं २२ रुग्णांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 02:18 PM2021-04-21T14:18:53+5:302021-04-21T15:02:52+5:30
Coronavirus, Oxygen leakage from tanker creates panic at Nashik hospital: हलगर्जीपणा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. १० ते ११ रुग्ण मृत्यू पडल्याची शक्यता असल्याचं महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितलं
नाशिक – एकीकडे राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा असताना दुसरीकडे नाशिकमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या टाकीला दुपारी १२ च्या सुमारास मोठ्या प्रमाणात गळती सुरु झाली. त्यामुळे टाकीमधून ऑक्सिजन वाया जात असल्याचं चित्र दिसून येत आहे. गळती बंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. परंतु ऑक्सिजन गळतीमुळे तब्बल २२ रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली.
तब्बल २ तासानंतर नाशिक महापालिका आयुक्तांनी रुग्णालयस्थळी भेट दिली. ऑक्सिजन गळती प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. हलगर्जीपणा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. १० ते ११ रुग्ण मृत्यू पडल्याची शक्यता असल्याचं महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितलं होतं. तर शिवसेनेच्या सुधाकर बडगुजर यांनी रुग्णालयाला भेट दिली त्यानंतर या घटनेमुळे ३०-३५ रुग्ण दगावल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
हॉस्पिटलमध्ये साधारणपणे १५० रुग्ण आहेत. ऑक्सिजन गळती होत असल्याने रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा हळूहळू संपत चालला आहे. त्यामुळे आणखी रुग्ण दगावण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ऑक्सिजन गळती रोखण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. या दुर्घटनेत १०-११ रुग्णांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असली तरी आणखी रुग्ण दगावण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ऑक्सिजन नसल्याने रुग्णांची प्रकृती खालावत चालली आहे.
महापालिकेचे हे संपूर्ण कोविड रुग्णालय आहे. अनेक रुग्ण ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटरवर आहेत. ऑक्सिजन टाकीला गळती लागल्याने अशा रुग्णांचा जीव धोक्यात आला असून त्यांना अन्य ऑक्सिजन असलेल्या रुग्णालयात स्थलांतरीत करण्यात येत आहे. नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून तातडीने १५ जम्बो ऑक्सिजन सिलिंडर रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी झाकीर हुसेन रूग्णालयात पाठविण्यात येत आहे. १० के एलची टाकी आहे. १५-२० दिवसांपूर्वीच टाकी बसविली होती. नाशिक महापालिकेने न्यू बिटको आणि झाकीर हुसेन रुग्णालयात ठेकेदारामार्फत भाड्याच्या टाक्या बसविल्या आहेत.
नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या ऑक्सिजन टाकीला मोठी गळतीhttps://t.co/CbvSFUjpi9#Nashikpic.twitter.com/1dZchKrOX4
— Lokmat (@MiLOKMAT) April 21, 2021