Nashik Oxygen Leak: नाशिकच्या घटनेनं तुकाराम मुंडे सुन्न...; नाशिककरांचाही साहेबांना भावनिक रिप्लाय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 11:20 PM2021-04-21T23:20:08+5:302021-04-21T23:21:05+5:30
Nashik Oxygen Leak: राज्यामध्ये कोरोनाच्या संकटाशी समर्थपणे लढा दिला जात असतांना नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत 22 रुग्णांनी आपला प्राण गमावला.
मुंबई - नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्त तुकाराम मुंढे यांची सचिवालयात बदली करण्यात आली आहे. कोरोना कालावधीत तुकाराम मुंडे यांनी नागपूरमध्ये भरीव काम केलं. नागपूरमधील कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यात आणि रुग्णांना चांगली सेवा देण्यात त्यांना जराही कसर सोडली नाही. त्यामुळेच, नागपूर येथून तुकाराम मुंडेंची बदली झाल्यानंतर नागरिक रस्त्यावर उतरले होते. तुकाराम मुंडेंनी आज नाशिकमधील ऑक्सिजन टाकी गळतीच्या दुर्घटनेबाबत फेसबुकवरुन शोक व्यक्त केलाय. त्यावरही, नाशिककरांना त्यांची आठवण झाली आहे.
राज्यामध्ये कोरोनाच्या संकटाशी समर्थपणे लढा दिला जात असतांना नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत 22 रुग्णांनी आपला प्राण गमावला. ही घटना अतिशय दुर्दैवी असल्याचे सांगत, पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अनेक दिग्गज नेत्यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही शब्दात व्यक्त न होण्यासारखं हे दु:ख असल्याचं म्हटलंय. या दुर्घटनेनं अवघा महाराष्ट्र हळहळला असून शोकमग्न झाला आहे. नाशिक महापालिका आयुक्तपदी यापूर्वी काम केलेल्या सनदी अधिकारी तुकाराम मुंडेंनीही या घटनेबाबत दु:खी भावना व्यक्त केल्या आहेत.
नाशिकची दुर्घटना अत्यंत दुर्दवी आणि मन हेलावून टाकणारी आहे. या घटनेनं आपण सुन्न... निशब्द... झालो आहोत, अशी भावना सनदी अधिकारी आणि नाशिक महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंडेंनी व्यक्त केली आहे. तुकाराम मुंडेंनी आपल्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवरुनही दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली. त्यावेळी, एका युजर्संने कमेंट करुन तुकाराम मुडें साहेब, नाशिकला आज आपण हवे होतात, अशी भावना व्यक्त केली. तुमच्या नेतृत्वात उत्कृष्ट प्रशासनाचा अनुभव नाशिककरांनी घेतला असता, असेही त्याने म्हटले आहे.
#नाशिक ची अत्यंत मन हेलावून टाकनारी, दुर्देवी व वेदनादायक घटना. सुन्न .....
— Tukaram Mundhe (@Tukaram_IndIAS) April 21, 2021
दरम्यान, तुकाराम मुंढे यांची राज्य सरकारने नाशिकमधून अवघ्या नऊ महिन्यांत बदली झाली होती. गेल्या बारा वर्षातील मुंढे यांची ती अकरावी बदली ठरली. त्यांची २०१६ पासूनची ही चौथी बदली आहे. आधी ते पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष, तत्पूर्वी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त होते आणि त्याआधी सोलापूरचे जिल्हाधिकारी होते.
नाशकात महापालिकेने संमत केलेली अडीचशे कोटी रुपयांची कामे रद्द करण्यावरून त्यांची तेथील पदाधिकाऱ्यांसमवेत पहिली ठिणगी पडली. १ मार्चपासून त्यांनी वार्षिक भाडेमूल्यात सुधारणा करताना हरित पट्ट्यासह पार्किंग आणि अन्य मोकळ्या जागांवर करवाढ केल्याने आंदोलने पेटली. नाशिक महापालिकेत मुंढे यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल करण्याची घटनाही घडली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्तक्षेपामुळे ही नामुष्की टळली असली होती. त्यामुळे, नाशिकमध्येही तुकाराम मुंडे यांच्या कामाची जोरदार चर्चा होती. त्यामुळेच, नागरिकांचा त्यांना पाठिंबा होता.