कुपोषण निर्मूलनाचा ‘नाशिक पॅटर्न’ यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:12 AM2020-12-26T04:12:02+5:302020-12-26T04:12:02+5:30
मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अंगणवाड्या बंद करण्यात आल्या. त्यामुळे या अंगणवाड्यांमध्ये जाणाऱ्या कुपोषित बालकांच्या आरोग्याचा व पोषणाचा प्रश्न ...
मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अंगणवाड्या बंद करण्यात आल्या. त्यामुळे या अंगणवाड्यांमध्ये जाणाऱ्या कुपोषित बालकांच्या आरोग्याचा व पोषणाचा प्रश्न निर्माण झाला. मात्र शासनाने या बालकांना घरपोच पोषण आहार देण्याचा निर्णय घेऊन अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या माध्यमातून तो पोहोचविला. मार्च महिन्यात जिल्ह्यात ८१० बालके तीव्र कुपोषित होती. कोरोनामुळे संपूर्ण अर्थव्यवस्था ठप्प होऊन ग्रामीण भागात शेतकामे बंद असताना कुपोषित बालकांचे उदरभरणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला असता, जिल्हा परिषदेने ‘एक मूठ पोषण आहार’ योजना राबवून गावागावांतील ग्रामपंचायतींच्या निधीतून गावातील कुपोषित बालके, गरोदर व स्तनदा मातांना पोषण आहार पुरविला. परिणामी कुपोषित बालकांचे पोषण झालेच, त्याचबरोबर गरोदर मातांचे उदरभरण होऊन कुपोषित बालके जन्मास येण्याचे प्रमाण घटले. नोव्हेंबर अखेर तीव्र कुपोषित बालकांची संख्या ३७१ होऊन जवळपास ४३९ बालकांचे वजन वाढून ते सुदृढ झाले.
-------
पालकांनीही घेतली बालकांची काळजी
कोरोनाचा परिणाम आदिवासी भागातील जनजीवनावरही झाला. शहरात रोजगारासाठी स्थलांतरित झालेल्यांना पुन्हा गावी परतावे लागले. शेतीची कामेही ठप्प झाल्याने हाताला काम नसल्याने कसेबसे उदरभरण करणाऱ्या पालकांनी मात्र या काळात आपल्या बालकांच्या आरोग्याची चांगली काळजी घेतली. त्यांना वेळीच्या वेळी पोषण आहार देण्यावर लक्ष केंद्रित केले. परिणामी कुपोषण कमी करण्यास हातभार लागला.
-----
अंगणवाडी सेविका, मदतनिसांना श्रेय
कुपोषित बालकांची संख्या कमी करण्याकामी गावोगावच्या अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची मेहनत महत्त्वाची ठरली. कोरोनाच्या काळात स्वत:ची काळजी घेतानाच गावातील कुपोषित बालके, गरोदर व स्तनदा मातांना वेळेच्या वेळी पोषण आहाराचे वाटप, आरोग्यविषयक मार्गदर्शन, प्रसंगी औषधोपचारासाठी मदत केल्याने या काळात बालमृत्यू व बाळंतपणातील मृत्यूचे प्रमाण घटले.
-----
अशा राबविल्या योजना
* बालकांना दररोज गूळ, शेंगदाणे, फुटाणे, खोबरेल तेल, बटाटे, मूग, चणे, अंडी, केळी आदींचा पोषण आहार देण्यात आला.
* बालकांना नियमित अन्न दिले जावे यासाठी भात, नागली, भुईमूग, वरई यांच्या वेगवेगळ्या रेसिपीचे प्रात्यक्षिक त्यांच्या पालकांना अंगणवाडी सेविकांनी दिले.
* पोषण आहार वेळीच्या वेळी दिला जावा यासाठी बालकाच्या घरात वेळापत्रक लावण्यात आले.
* पोषण आहाराचा विनियोग योग्य होतो की नाही, यासाठी दर आठवड्याला घरभेटी, दर महिन्यात बालकांचे वजन घेऊन त्याद्वारे आहारात बदल.