अपंगाना घरपोच धान्य देण्याचा नाशिक पॅटर्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 06:31 PM2017-12-27T18:31:55+5:302017-12-27T18:33:46+5:30
सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गंत अनेक नवनवीन संकल्पना राबविल्या जात असून, त्याचाच भाग म्हणून अपंग व अतियश वयोवृद्ध असलेल्या शिधापत्रिकाधारकांना सार्वजनिक वितरणाचा लाभ देण्याची योजना सुरू करण्याचे ठरविण्यात आले आहे.
नाशिक : वयोवृद्ध व अपंग जे स्वस्त धान्य दुकानापर्यंत पोहोचू शकत नाही, अशा लाभार्थ्यांच्या घरी जाऊन धान्य वाटप करण्याचा नाशिक पॅटर्न जिल्हा पुरवठा विभागाने सुरू केला असून, त्याची सुरूवात अलिकडेच पार पडलेल्या जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्ताने करण्यात आली आहे. तालुक्याच्या तहसिलदारांनी रेशन दुकानदारांच्या माध्यमातून अपंग शिधापत्रिकाधारकांची माहिती गोळा करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गंत अनेक नवनवीन संकल्पना राबविल्या जात असून, त्याचाच भाग म्हणून अपंग व अतियश वयोवृद्ध असलेल्या शिधापत्रिकाधारकांना सार्वजनिक वितरणाचा लाभ देण्याची योजना सुरू करण्याचे ठरविण्यात आले आहे. शिधापत्रिकाधारकांना दरमहा रेशनमधून स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून दिले जात असले तरी, निराधार व अपंग असलेल्या शिधापत्रिकाधारकांना गावातील रेशन दुकानापर्यंत जाऊन धान्य घेणे दरमहा शक्य होत नाही, अशा वेळी त्यांच्या नावे असलेले धान्याचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता अन्न व पुरवठा मंत्रालयाने शिाधापत्रिकाधारकांना बायोमॅट्रीक पद्धतीने धान्य देण्याचा निर्णय घेतल्यामुळे थेट शिधापत्रिकाधारकाच्या दाराशी जावून रेशन दुकानदार धान्याचे वितरण करू शकत असल्याची बाब पुरवठा खात्याच्या निदर्शनास आली आहे. त्याची सुरूवात नाशिकपासून करण्याचे ठरविण्यात आले असून, हा पॅटर्न ‘नाशिक पॅटर्न’ म्हणून ओळखला जाऊ शकतो. जिल्ह्यातील अपंग जे रेशन दुकानापर्यंत पोहोचू शकत नाही अशांचा शोध घेऊन रेशन दुकानदाराने त्यांच्या घरी जाऊन महिन्याचे धान्य वितरण करण्याचे ठरविण्यात आले आहे. अर्थातच लाभार्थ्याच्या अपंगत्वाचा गैरफायदा रेशन दुकानदाराने उचलू नये यासाठी धान्य वाटप करताना त्याने परिसरातील नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ते वाटप करणे बंधनकारक करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात जागतिक ग्राहक दिनानिमित्त त्याची सुरूवात करण्यात आली असून, सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथील भागाबाई लक्ष्मण जाधव या ९० वर्षीय वृद्ध अपंग महिलेला सर्व प्रथम घरपोच धान्य वाटप करण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रिंप्री त्र्यंबक येथील श्रीमती सावित्रीबाई पालवे यांना तसेच खंबाळे येथील वयोवृद्ध निराधार व्यक्तीच्या घरी जाऊनही धान्याचे वाटप करण्यात आले आहे. जानेवारी महिन्यापासून जवळपास सर्वच अपंगाना घरपोच धान्य देण्याच्या सुचना पुरवठा खात्याने रेशन दुकानदारांना दिल्या आहेत.