८ फेब्रुवारीला ‘नाशिक पेलोटॉन २०१५’ नाशिक सायकलिस्ट : १५० किलोमीटर अंतर कापणार सायकलपटू
By admin | Published: December 15, 2014 01:48 AM2014-12-15T01:48:32+5:302014-12-15T01:49:28+5:30
८ फेब्रुवारीला ‘नाशिक पेलोटॉन २०१५’ नाशिक सायकलिस्ट : १५० किलोमीटर अंतर कापणार सायकलपटू
नाशिक : शहरात रुजलेली सायकल चळवळ अधिक व्यापक व्हावी या उद्देशाने गेल्या वर्षापासून शहरातील सायकलप्रेमींच्या नाशिक सायकलिस्ट या संस्थेच्या वतीने सायकलपटूंसाठी पेलोटॉन राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा ८ फेब्रुवारी रोजी शहरात ‘नाशिक पेलोटॉन २०१५’ ही सायकलपटूंची स्पर्धा रंगणार असून, यामध्ये सुमारे पाचशे स्पर्धक सहभागी होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष विशाल उगले यांनी पत्रकार परिषदेत दिली. गेल्या वर्षी झालेल्या पेलोटॉन स्पर्धा १४० व ५० किलोमीटर अशा दोन टप्प्यांमध्ये पार पडली होती व सदर स्पर्धेत चारशे सायकलपटूंनी सहभाग घेतला होता. राज्यासह देशात व जगात पेलोटॉन स्पर्धेसाठी नाशिक ओळखले जावे हा आमच्या संस्थेचा मानस आहे. घोटी, वैतरणा, त्र्यंबक, वाघेरा, गिरणारे, गंगापूर, आनंदवल्ली मार्गे आसारामबापू रोड असा १५० किलोमीटरचा मार्ग राहणार असून, पाच धरणांसह घाटाच्या निसर्गरम्य परिसरातून सायकलपटूंना या स्पर्धेच्या निमित्ताने आनंद घेता येणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात नाशिक घोटी-नाशिक असा ५० किलोमीटरच्या मार्गावर पुरुषांप्रमाणेच महिलांनादेखील सायकल स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. १८ ते ४५ व ४५ पेक्षा पुढे अशा दोन गटांत स्पर्धा होणार आहे. विजेत्यांना रोख रक्कम व सायकलीचे बक्षिसे मिळून एकूण नऊ लाखांपर्यंत बक्षिसांचे वाटप केले जाणार असल्याचे उगले यावेळी म्हणाले.