शस्त्रास्त्र प्रदर्शनात युद्धातील शक्तिशाली तोफा जवळून पाहण्याची नाशिककरांना संधी

By अझहर शेख | Published: March 18, 2023 10:56 AM2023-03-18T10:56:03+5:302023-03-18T10:56:23+5:30

नाशिककर जवळून बघताहेत 'युद्धाचा देव' मानल्या जाणाऱ्या शक्तिशाली तोफा; ईदगाह मैदानाला लष्करी छावणीचे स्वरूप.

Nashik People get a chance to see the powerful guns of the war up close at the arms exhibition | शस्त्रास्त्र प्रदर्शनात युद्धातील शक्तिशाली तोफा जवळून पाहण्याची नाशिककरांना संधी

शस्त्रास्त्र प्रदर्शनात युद्धातील शक्तिशाली तोफा जवळून पाहण्याची नाशिककरांना संधी

googlenewsNext

अझहर शेख

नाशिक : कारगिल युद्धानंतर प्रथमच नागरी भागातून सैन्यदलाच्या तोफांची वाहतुक नाशिकमध्ये दिसून आली. येथील नाशिकरोड तोफखाना केंद्राच्या (आर्टीलरी सेंटर) राज्यस्तरीय दोन दिवसीय शस्त्रास्त्र प्रदर्शनाला आजपासून सुरुवात झाली. या प्रदर्शनाचे उद्घाटन रस्ते वाहतुक व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी (दि.१८) ईदगाह मैदानावर करण्यात आले. हे प्रदर्शन नाशिककरांसाठी पुर्णत: खुले आहे. या मैदानावर प्रदर्शित केलेल्या बोफोर्स, धनुष्य, सॉल्टम आदी तोफांसह रॉकेट लौंचर आणि लॉरोससारखे आधुनिक रडार देखील नाशिककरांना जवळून बघता येत आहेत. 
 
भारतीय तोफखाना हा सैन्यदलाच्या पाठीचा कणा मानला जातो. तसेच 'युद्धाचा देव'असेही तोफखान्याला संबोधले जाते. या तोफखान्याचे सामर्थ्य लक्षात यावे, या उद्देशाने भारतीय संरक्षण खात्याच्या आदेशानुसार नाशिकरोड तोफखाना केंद्राकडून 'नो योर आर्मी' हे लष्करी शस्त्रास्त्रांचे राज्यस्तरीय प्रदर्शन नाशिकमध्ये भरविण्यात आले आहे. तोफखान्याचे कमान्डंट ब्रिगेडियर ए.रागेश यांच्या नेतृत्वाखाली हे प्रदर्शन पार पडत आहे. 

प्रदर्शनाचे उद्घाटन नितीन गडकरी यांनी आकाशात फुगे सोडून केला. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री डॉ.भारती पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, गिरीश महाजन,  स्कुल ऑफ आर्टीलरी चे कमांडन्ट लेफ्टनंट जनरल एस हरिमोहन अय्यर, तोफखाना केंद्राचे ब्रिगेडियर ए.रागेश, खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्रात प्रथमच अशाप्रकारचे सैनिकी शस्त्रांस्त्रांचे प्रदर्शन एखाद्या नागरी वस्तीतील मैदानावर होत आहे. यानिमित्ताने नाशिकसह संपुर्ण उत्तर महाराष्ट्रातील जनतेला तोफखान्याच्या शक्तीशाली आधुनिक तोफांसह रडार सिस्टीम, भुदलाकडे असलेल्या अत्याधुनिक रायफल्स, अश्वारूढ सैनिकांकडून दाखविले जाणारे सैनिकी प्रात्याक्षिकांसह तोफखाना केंद्राच्या विशेष बॅन्ड पथकाच्या गीतगायन-वादनाचा अनुभव घेता येणार आहे. रविवारी (दि.१९) रात्री साडेनऊ वाजता प्रदर्शनाचा समारोप होणार आहे.

या तोफा मैदानात प्रदर्शित

कारगिल विजयात निर्णायक भूमिका बजावणारी बोफोर्स तोफ, स्वदेशी बनावटीची आधुनिक धनूष, हलकी होवित्झर (एम-७७७), इंडियन फिल्ड सॉल्टम (१५५ एम.एम), हलकी तोफ (१०५एमएम), उखळी मारा करणारी तोफ (१३० एम.एम), मोर्टार (१२० एम.एम), मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर (बीएम२१), लोरोस रडार सिस्टीमसह अशा  लहान-मोठ्या 10 ते 15 तोफा नागरिकांना बघण्याची संधी यानिमित्ताने मिळाली आहे.  भुदलातील सैन्याकडे असलेल्या आधुनिक रायफल्स, मशिनगनदेखील प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. तसेच आपत्कालीन स्थितीत नदीवर तात्पुरता भक्कम पूल उभारणी करणारे खास लष्करी वाहनेही याठिकाणी प्रदर्शित करण्यात आली आहेत.
आहे.

या अश्वरूढ सैनिकांनी केला सॅल्युट

‘तुफान’, ‘शायनिंग स्टार’, ‘मॅक्स’, ‘साहिबा’, या चार प्रशिक्षित सैनिकी अश्वांच्या सहाय्याने हवालदार प्रधान चौधरी, राजकुमार, नायक दिलीपकुमार, लान्स नायक अमोल सानप यांनी व्यासपीठासमोर अश्वाहून येत झेंडा रोवून लष्करी थाटात मान्यवरांना सॅल्युट केला.

शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची लोटली गर्दी

तोफांचे प्रदर्शन बघण्यासाठी मैदानात नाशिकमधील विविध शाळांसह महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने आले आहेत. यामुळे मैदानात उभारण्यात आलेला डोम हाऊसफुल्ल झाला. यामुळे शालेय मुलांना डोममध्ये खाली बसावे लागले. 'भारत माता की जय..', 'वंदे मातरम..'चा मुलांनी केलेल्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.

Web Title: Nashik People get a chance to see the powerful guns of the war up close at the arms exhibition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.