अण्णा भाऊ साठे जयंती : मिरवणूकीने वेधले नाशिककरांचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 09:27 PM2018-08-01T21:27:25+5:302018-08-01T21:28:14+5:30
भद्रकाली टॅक्सी थांबा मातंगवाडा येथील तरुण मित्र मंडळाने आकर्षक सजावट केलेला चित्ररथ लक्षवेधी ठरला. तसेच मखमलाबाद नाका येथील वरदविनायक ढोल-ताशा पथकाच्या वादक आणि क्रांतीवर लहुजी वस्ताद बहुउद्देशीय संस्थेचे मंडळ मिरवणूकीचे आकर्षण ठरले.
नाशिक : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जुने नाशिकमधील बागवानपुरा येथील महात्मा फुले चौकातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत शहर व परिसरातील सुमारे दहा मंडळांचे चित्ररथ व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा फुले चौकात फुले यांच्या अर्धकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर महापौर रंजना भानसी यांनी मिरवणूकीतील पहिल्या मंडळाच्या चित्ररथापुढे श्रीफळ वाढवून शुभारंभ केला. यावेळी नगरसेवक गजानन शेलार, वत्सला खैरे, आशा तडवी, रामसिंग बावरी, वरिष्ठ पोलीस निरिक्षक मधुकर कड, पोलीस निरिक्षक भारतकुमार सुर्यवंशी यांसह विविध मंडळांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान, मिरवणूकीत समाजबांधव पिवळ्या रंगाचा फेटा परिधान करुन सहभागी झाले होते. सहभागी समाजबांधवांनी अण्णाभाऊ यांचा जयघोष करत अभिवादन केले.अग्रभागी लहुजी मित्र मंडळाच्या सजविलेल्या बग्गीमध्ये साठे यांचा अर्धकृती पुतळा होता. भद्रकाली टॅक्सी थांबा मातंगवाडा येथील तरुण मित्र मंडळाने आकर्षक सजावट केलेला चित्ररथ लक्षवेधी ठरला. तसेच मखमलाबाद नाका येथील वरदविनायक ढोल-ताशा पथकाच्या वादक आणि क्रांतीवर लहुजी वस्ताद बहुउद्देशीय संस्थेचे मंडळ मिरवणूकीचे आकर्षण ठरले.
मिरवणूक बागवानपुरा, दूध बाजार, शहीद अब्दुल हमीद चौक, भद्रकाली, मेनरोडवरुन शालिमारमार्गे भालेकर शाळेच्या मैदानाला लागून असलेल्या अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ मिरवणूकीचा समारोप करण्यात आला. मिरवणूकीत मोठ्या संख्येने मातंग समाजबांधव सहभागी झाले होते.
या मंडळांचा सहभाग
जय लहुजी मित्र मंडळ, राजीवनगर, बाबासाहेब गोपले बहुउद्देशीय संस्था, अखिल भारतीय मातंग संघ, जय लहुजी मित्रमंडळ, सिडको, साठे मित्र मंडळ, जुने नाशिक मित्र मंडळ, मरीमाता मित्र मंडळ, लहुजी युवा प्रतिष्ठान, लहुजी वस्ताद मित्र मंडळ, सातपूर यांचा मिरवणूकीत सहभाग होता.