अजानच्यावेळी हनुमान चालिसा लावता येणार नाही; नाशिक पोलीस आयुक्तांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 12:41 PM2022-04-18T12:41:38+5:302022-04-18T12:44:00+5:30
नाशिक पोलीस आयुक्तांनी आदेश काढले
नाशिक: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांवरून राज्य सरकारला अल्टीमेटम दिल्यानंतर अजान-हनुमान चालिसा वाद पेटला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस प्रशासनानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लाऊड स्पीकरवर हनुमान चालिसा किंवा भजन लावण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. अजानच्या १५ मिनिटं आधी किंवा १५ मिनिटं नंतर हनुमान चालिसा किंवा भजन लावता येणार नाही, असंही पोलिसांनी आदेशात म्हटलं आहे.
मशिदीच्या आसपास असलेल्या १०० मीटरच्या भागासाठी पोलीस प्रशासनानं आदेश जारी केले आहेत. हनुमान चालिसा किंवा भजन वाजवण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल असं नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेंनी सांगितलं. मात्र अजानच्या आधी आणि नंतर १५ मिनिटं परवानगी नसेल हे त्यांनी स्पष्ट केलं. मशिदीपासून १०० मीटर परिसरात हनुमान चालिसा लावता येणार नाही. कायदा, सुव्यवस्था आणि शांतता कायम राखण्यासाठी हा आदेश काढण्यात आल्याचं पांडे म्हणाले.
३ मेपर्यंत सर्व धार्मिक स्थळांना लाऊड स्पीकरचा वापर करण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल. त्यानंतर नियमांचं उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दीपक पांडेंनी दिला आहे. ३ मेपर्यंत म्हणजेच रमजान ईदपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवा, अन्यथा मशिदींसमोर लाऊड स्पीकरवर हनुमान चालिसा वाजवू, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी काढलेला आदेश महत्त्वाचा मानला जात आहे.
मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांची बैठक सुरू
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची बैठक सुरू आहे. यामध्ये अजान-हनुमान चालिसा वादावर चर्चा होत असल्याचं समजतं. नाशिकसारखाच निर्णय संपूर्ण राज्यात लागू होण्याची शक्यता आहे. गृहमंत्री डीजीपींसोबतच्या बैठकीत याबद्दलचा आदेश देऊ शकतात.