नाशिक पोलीस आयुक्तालयातील वाहतूक शाखेच्या पोलीसाने केली कोल्हापूरच्या सराफाची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 08:16 PM2017-08-26T20:16:41+5:302017-08-26T20:26:08+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील सराफ व्यवसायिकास क्राईम ब्रँचचे पोलीस कर्मचारी असल्याचे सांगून तिघांनी केलेल्या एक लाख रुपये लुटीचा ग्रामीण पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या २४ तासात छडा
नाशिक : कोल्हापूर जिल्ह्यातील सराफ व्यवसायिकास क्राईम ब्रँचचे पोलीस कर्मचारी असल्याचे सांगून तिघांनी केलेल्या एक लाख रुपये लुटीचा ग्रामीण पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या २४ तासात छडा लावला आहे़ या लूट प्रकरणी तीन संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ९६ हजारांची रोकडही जप्त करण्यात आली आहे़ विशेष म्हणजे या लुटीचा मास्टरमार्इंड गणेश शांताराम उकाडे (रा़.बारागाव प्रिंप्री, ता़सिन्नर) हा नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील वाहतूक शाखेच्या युनिट क्रमांक ४ मध्ये पोलीस शिपाई या पदावर तर उवरीत दोघे त्याचे मित्र असल्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले़.
दराडे यांनी सांगितले की, ईपरी हातकणंगले येथील सोन्या-चांदीचे व्यापारी राजेंद्र बाळगोंडा पाटील व त्यांचा मुलगा मनिष राजेंद्र पाटील हे शुक्रवारी (दि़२५)कामानिमित्त सिन्नरमधील एका सराफी व्यवसायिकाकडे आले होते़. त्यांचे काम आटोपल्यानंतर दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास ते कोल्हापूरला जाण्यासाठी आपल्या होंडा सिटी कारने निघाले़ सिन्नर - पुणे महामार्गावरील रौनक लॉन्सजवळून जात असताना पाठीमागून होंडा पॅशन दुचाकीवर आलेले शहर वाहतूक शाखेचा पोलीस कर्मचारी संशयित गणेश उकाडे व त्याचा साथीदार महेश शांताराम उगले (रा.क़ानडीमळा, सिन्नर) व समाधान दिनकर ढेरींगे (रा़पळसे, फुलेनगर, नाशिक) यांनी कारला दुचाकी आडवी लावली़. यानंतर पाटील पिता-पुत्रांचे मोबाईल हिसकावून घेत आम्ही क्राईम ब्रँचचे पोलीस आहोत तुमच्याकडे किती सोन्या-चांदीचे दाबिने आहेत़ तुमच्या गाडीचे सीटी फाडून आम्ही गाडी चेक करतो अशी दमबाजी करीत हॉटेल शाहूसमोर घेऊन गेले़ या ठिकाणी दमबाजी करीत पाटील यांच्या कारच्या डिक्कीमधील एक लाख रुपयांची रक्कम बळजबरीने काढून घेत निघून गेले़
या प्रकरणी पाटील यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद देताच पोलीस अधीक्षकांच्या सूचनांनुसार करण्यात आलेल्या तपासी पथकाने इसमांचे वर्णन तसेच दुचाकीचा नंबर जाणून घेतला़ पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली असता ही दुचाकी शहर वाहतूक शाखेतील पोलीस शिपाई गणेश उकाडे याची असल्याचे समोर आले़ त्यानुसार पोलिसांनी संशयित गणेश उकाडे, महेश उगले व समाधान ढेरींगे या तिघांना ताब्यात घेऊन पोलीसी खाक्या दाखविताच त्यांनी लूटीची कबुली दिली़ त्यांच्याकडून ९६ हजारांची रोकड व गुन्ह्यातील दुचाकी जप्त केली आहे़
पोलीस उपअधीक्षक विशाल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक गिºहे यांनी दिलेल्या सूचनांनुसार सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, सहायक पोलीस उपनिरीक्षक जी़डी़परदेशी, पोलीस नाईक भगवान शिंदे, सचिन गवळी, पोलीस शिपाई प्रविण गुंजाळ, विनोद टिळे यांच्या तपास पथकाने अवघ्या २४ तासात हा गुन्हा उघडकीस आणला़.