नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या हद्दवाढीच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:03 AM2020-02-22T00:03:32+5:302020-02-22T01:17:02+5:30
नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या हद्दवाढीसंदर्भात हालचाली गतिमान झाल्या असून, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्यासंदर्भातील अहवाल शासनाकडे पाठविण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या हद्दवाढीत ओझर शहरासह नाशिक, दिंडोरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काही गावे समाविष्ट होणार आहेत.
सुदर्शन सारडा ।
ओझर : नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या हद्दवाढीसंदर्भात हालचाली गतिमान झाल्या असून, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्यासंदर्भातील अहवाल शासनाकडे पाठविण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या हद्दवाढीत ओझर शहरासह नाशिक, दिंडोरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काही गावे समाविष्ट होणार आहेत. ओझर पोलीस ठाण्याचा समावेश नाशिक पोलीस आयुक्तालयात होणार असल्याने सध्या शहरापासून तीन किमी अंतरावर असलेले पोलीस ठाणे ओझर गावातच करावे, अशी मागणी आता ओझरकर नागरिकांकडून होऊ लागली आहे.
ओझर शहराचा वाढता विस्तार हा मुख्यत्वे दक्षिणेस होत असून, अनेक उपनगरे आता नाशिक शहरालगतच वसलेली आहेत. त्यातच ओझर पोलीस ठाण्याला नाशिक तालुक्यातील सिद्धपिंप्री तसेच दिंडोरी तालुक्यातील जऊळके, जानोरी ही गावे जोडण्यात येणार आहेत. सध्याचे असलेले पोलीस ठाणे हे या गावांपासून दूर अंतरावर आहे. ओझर गावातच गडाख चौफुलीलगत ग्रामपालिका मिळकत नंबर १२३१ ही पोलिसांची हक्काची जागा सध्या ओसाडच असून, याच जागेवर नवीन पोलीस ठाणे झाल्यास महामार्गावर असलेल्या विविध उपनगरांतील नागरिकांना तसेच नव्याने जोडण्यात येणाऱ्या सिद्धपिंप्री, जानोरी, जऊळके दहावा मैल यांना देखील सोयीस्कर होऊ शकेल, अशी नागरिकांची मागणी आहे. सध्या ओझर गावात असलेली पोलीस चौकी ही शोभेपुरतीच असून, याठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नसल्याने साधी तक्र ार देण्यासाठी नागरिकांना गावापासून तीन किमी अंतर पार करून जावे लागते. तर दहावा मैल व नगरातील नागरिकांसाठी हेच अंतर पाच ते सात किमी पडते. ओझर पोलीस ठाण्याचा नाशिक पोलीस आयुक्तालयात समावेश झाल्यानंतर कर्मचारी वाढीसोबतच बीट मार्शल व पेट्रोलिंग वाहनांच्या संख्येत वाढ होऊन कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने विविध सुविधा उपलब्ध होऊ शकणार आहेत.
संख्याबळ वाढणार
सध्या ओझर पोलीस ठाण्यात एक पोलीस निरीक्षक, एक पोलीस उपनिरीक्षक व चाळीस कर्मचारी हे संख्याबळ असून, सध्याच्या ओझर पोलीस ठाण्याच्या हद्दीचा विचार करता पाच हजार नागरिकांमागे एक पोलीस अशी स्थिती आहे. सदर पोलीस ठाणे आयुक्तालयात समाविष्ट झाल्यानंतर एक वरिष्ठ पोलीस अधिकारी व सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह शंभरच्या आसपास पोलीस कर्मचारी असा पोलिसांचा लवाजमा ओझरसाठी मिळणार आहे. शिवाय, पेट्रोलिंगसाठी जादा वाहनेदेखील उपलब्ध होणार आहेत.
ओझर, जऊळके, जानोरी व इतर काही गावे आणि तेथील पोलीस ठाणेही नाशिक पोलीस आयुक्तालयात समाविष्ट करण्यासाठी शासनाने अहवाल मागितला होता. त्यातील बरीच माहिती पहिल्यांदा पाठविली तर काही माहिती व इतर बाबी काल-परवाच जिल्हाधिकारी कार्यालयातून शासनाकडे पाठविण्यात आल्या आहेत. ग्रामीण पोलिसांकडून नाशिक आयुक्तालयात ही गावे समाविष्ट होणार हे नक्की असले तरी ते कधी होईल याबाबत शासनच निर्णय घेईल.
- डॉ. आरती सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक