नाशिक पोलीस अखेर रिकाम्या हातीच परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:18 AM2021-08-26T04:18:02+5:302021-08-26T04:18:02+5:30
नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यासाठी संगमेश्वर येेथे रवाना ...
नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यासाठी संगमेश्वर येेथे रवाना झालेल्या पथकाला बुधवारी (दि. २५) रिकाम्या हाती परतावे लागले आहे. नारायण राणे यांना जामीन मिळाल्याने त्यांची अटक टळली असली तरी नाशिकमधील गुन्ह्यात त्यांना जबाबासाठी येत्या गुरुवारी (दि. २ सप्टेंबर) नाशिक पोलिसांसमोर हजर राहावे लागणार असून, नाशिक पोलीस पथकाने तसे समन्स त्यांना बजावल्याची माहिती पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी दिली आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक पोलीस पथक संगमेश्वरला पोहोचले होते. मात्र, याचदरम्यान नारायण राणे यांना रायगड पोलीस घेऊन गेले होते. त्यामुळे तेथील कारवाईबाबत सुनावणी सुरू झाली हाेती. न्यायालयात नाशिक पोलिसांकडून नाशिकमध्ये दाखल गुन्ह्याविषयी भूमिका मांडून २ सप्टेंबरला नाशिकमध्ये हजर राहण्याची विनंती करण्यात आली. त्यानुसार त्यांना यावे लागणार असून, त्यांना नाशिक पोलिसांनी कायद्याला धरून नोटीस काढल्याचा पुनरुच्चारही पोलीस आयुक्तांनी केला. आहे. दरम्यान, रायगड पोलिसांची न्यायालयीन कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने न्यायालयात नाशिक पोलिसांनी भूमिका मांडली. तसेच नारायण राणे यांनी दिलेली नोटीस स्वीकारत स्वाक्षरी करीत तपासाला सहकार्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे पोलीस समाधानी असून नारायण राणे २ सप्टेंबरला नाशिकमध्ये उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
इन्फो
केेंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात दाखल गुन्ह्यात चौकशी करण्यासाठी संबंधित व्यक्तीचा जबाब नोंदविला जातो. पुरावे सादर करण्यासाठी मुभा दिली जाते. त्यानुसार नारायण राणे यांना २ सप्टेंबर ही तारीख दिली आहे. ते स्वतः सहकार्य करणार आहेत. अशा घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, असे त्यांनी लिहून दिले आहे. त्यामुळे नाशिक पोलिसांनी अटकेची कारवाई केली नाही, असे नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी सांगितले.