जेव्हा पोलीस अंगणात येऊन म्हणतात, 'मुबारक हो तुमको ये शादी तुम्हारी..'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 10:09 AM2020-04-29T10:09:07+5:302020-04-29T10:11:42+5:30
घरातच विवाह आटोपलेल्या जोडप्याला शुभेच्छा देण्यासाठी पोलीस पोहोचले; नवविवाहितेच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू
-अझहर शेख
नाशिक: सर्वत्र लॉकडाऊन अन संचारबंदी जमावबंदी आदेश लागू... अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडल्यास पोलिसांकडून होते कारवाई... अशातच भर दुपारी नाशिकच्या अशोकामार्ग परिसरात एका अपार्टमेंटखाली पोलिसांचा ताफा सायरन वाजवीत दाखल होतो अन रहिवाशांच्या मनात शंकेची पाल चुकचुकते. मात्र हा पोलीस ताफा कोणावर कारवाई करण्यासाठी नव्हे तर चक्क एका नववधू-वराला विवाहच्या शुभेच्छा देण्यासाठी दाखल झालेला असतो. क्षणार्धात पोलीस वाहनाच्या ध्वनिक्षेपकावरून 'मुबारक हो तुमको ये शादी तुम्हारी...' या गीत ऐकू येऊ लागतात अन मग काय सगळे रहिवाशी आपापल्या खिडकी, बाल्कनीत येऊन पोलिसांच्या या आगळ्या उपक्रमाला टाळ्यांच्या गजराने प्रतिसाद देतात.
अशोकामार्गावरील श्री गणेशबाबा समाधी मंदिरासमोरील एका अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या जोशी कुटुंबातील हरिणी नामक युवतीचा पूर्वनियोजित विवाह ठरलेला. लॉकडाऊन काळात हा विवाह अगदी साधेपणाने घरच्या घरी कुठल्याही प्रकारचा उत्सवी स्वरूप न देता आटोपण्याचा निर्णय वधू-वर पक्षाकडून घेतला गेला. नवरदेव थेट गुजरातवरून आपल्या बसत्यासह गुजरात सरकारच्या परवानगीने एकटाच बोहल्यावर चढण्यासाठी नववधूच्या घरी पोहचला. पारंपरिक वैदिक पद्धतीने घरातच हरिणी आणि निकुंज यांनी सात फेरे पूर्ण केले. 24 तास देशाची अन राज्याची आरोग्ययंत्रणा कोरोनावर मात करण्यासाठी युद्धपातळीवर झटत आहे, आणि त्यांच्या प्रयत्नांना यशस्वी करण्यासाठी पोलीस प्रशासन अगदी खांद्याला खांदा लावून परिश्रम घेत आहेत. 'कोरोनाला हारावयचं मग, आपण घरातच थांबा' असे कळकळीचे आवाहन सर्व स्तरातून नागरिकांना केले जात आहे. त्यामुळे कोरोना अन गर्दीचे घातक समीकरण आपण आपल्या रेशीमगाठी बांधतानासुध्दा जुळून येऊ देणार नाही असा चंग हरिणी आणि निकुंज या दोघांनी बांधला. निकुंजच्या कुटुंबाने आपल्या लाडक्याचा विवाहसोहळा चक्क व्हिडिओ कॉलवरून अनुभवला आणि दोघांनाही भावी आयुष्यासाठी शुभाशीर्वाद दिले.
अगदी साधेपणाने आटोपशीर झालेल्या या विवाहाची वार्ता नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना समजली तेव्हा त्यांनी एका सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यास नवदाम्पत्याला लग्नाच्या शुभेच्छा देऊन या, असे सुचविले. पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ताफा घेऊन ते नववधू च्या अंगणात दाखल झाले. पोलीस वाहनांचा सायरन कानी येताच परिसरात निरव शांतता पसरली. नखाते यांनी ध्वनिक्षेपकाद्वारे हरिणी आणि निकुंज यांना बाल्कनीत बोलावून 'तुम्ही अगदी साधेपणाने विवाह आटोपून सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले, आणि सामाजपुढे आगळावेगळा आदर्श ठेवला, म्हणून शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आलो आहोत' असे सांगितले अन सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.
हरिणीच्या डोळ्यांत तरळले आनंदाश्रू
जेव्हा पोलिसांनी ध्वनिक्षेपकाद्वारे मोबाईलमधील 'तेरे माथे की बिंदीया चमकती रहे, तेरे हाथो की महेंदी महेकती रहे, तेरे जोडे की रौनक सलामत रहे, 'तेरी चुडी हमेशा खनकती रहे....., मुबारक हो तुमको ये शादी तुम्हारी....' हे गीत सुरू करताच हरिणीच्या डोळ्यांत पुन्हा आनंदाश्रू आले, आणि निकुंजने तिला सावरताच या दोघांनी टाळ्यांच्या कडकडाटात बाल्कनीत उभे राहून खाली आलेल्या पोलिसांचे मनापासून आभार मानले.