नाशिक पोलीस : चोरीला गेलेल्या मौल्यवान वस्तू परत मिळतात तेव्हा...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 03:41 PM2018-01-06T15:41:18+5:302018-01-06T15:49:10+5:30
शहरातील भद्रकाली, सरकारवाडा, पंचवटी, गंगापूर, आडगाव, म्हसरुळ, मुंबईनाका, इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड, देवळाली कॅ म्प, सातपुर, अंबड या सर्व पोलीस ठाण्यांमधील विविध गुन्ह्यांची उकल करुन सुमारे २० लाख २५ हजार ४३२ रुपयांचा मुद्देमाल पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांच्या हस्ते समारंभपुर्वक प्रदान करण्यात आला.
नाशिक : हरविलेली वस्तू पुन्हा सापडणे कदाचित शक्य असते; मात्र चोरी गेलेली मौल्यवान वस्तू पुन्हा काही दिवसांनी हाती पडेल, अशी भाबडी आशाही कोणी सहसा बाळगत नाही. कारण चोरट्याने चोरी केलेली वस्तू परत मिळणार कशी? या प्रश्नाने सर्वसामान्यांच्या मनात घर करणे सहाजिकच आहे; मात्र नाशिक पोलिसांनी आॅक्टोबर ते डिसेंबर महिन्यात शहरात पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडलेल्या सोनसाखळी, दुचाकी चोरी, मोबाईल चोरी, घरफोडीच्या विविध गुन्ह्यांची उकल करुन संशयितांच्या मुसक्याही आवळल्या आणि त्यांच्याकडून चोरीच्या मौल्यवान वस्तू हस्तगत करुन मुळ मालकांना समारंभपुर्वक प्रदान केल्या. यावेळी ज्यांच्या गळ्यातील सौभाग्याचं लेणं चोरीला गेले होते ते हातात सन्मानपुर्वक दिले गेले यावेळी त्या महिलांच्या चेहºयावरील आनंदाचे भाव व पोलिसांविषयीचा वाटणारा अभिमान निराळाच होता.
शहरातील भद्रकाली, सरकारवाडा, पंचवटी, गंगापूर, आडगाव, म्हसरुळ, मुंबईनाका, इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड, देवळाली कॅ म्प, सातपुर, अंबड या सर्व पोलीस ठाण्यांमधील विविध गुन्ह्यांची उकल करुन सुमारे २० लाख २५ हजार ४३२ रुपयांचा मुद्देमाल पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांच्या हस्ते समारंभपुर्वक प्रदान करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून ‘महाराष्ट टाईम्स’चे निवासी संपादक शैलेंद्र तनपुरे उपस्थित होते. तसेच व्यासपिठावर उपआयुक्त विजयकुमार मगर, लक्ष्मीकांत पाटील, श्रीकृष्ण कोकाटे, माधुरी कांगणे आदि उपस्थित होते.
दरम्यान, कोकाटे व मगर यांनी उपस्थित नागरिकांना विविध गुन्हयांच्या घटनांपासून कशी सावधगिरी बाळगावी याविषयी मार्गदर्शन केले. तसेच आधुनिकतेच्या काळात इंटरनेटच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारीविषयीदेखील नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे असल्याचे कोकाटे म्हणाले.
यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात मुद्देमाला परत मिळालेल्या नागरिकांपैकी अमोल जाधव, जाकीर काजी, सोनल रसाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी आठ लाख ५६ हजार २८७ रुपये किंमतीच्या २२ दुचाकी, ८ लाख ५६ हजार २८७ रुपये किंमतीच्या १२ सोनसाखळी, १ लाख ६८ हजार रुपयांचे ९ मोबाईल संबंधित मुळ मालकांना वाटप करण्यात आले.
प्रास्ताविक लक्ष्मीकांत पाटील यांनी केले, सुत्रसंचालन सहायक आयुक्त अशोक नखाते यांनी केले व आभार माधुरी कांगणे यांनी मानले.